आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमानचे वजन घटलेच नाही; बहिणीचा अाराेप, वजन 500 किलाेवरुन 171 किलाेपर्यंत घटवल्याचा रुग्णालयाकडून दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई- मुंबईतल्या सैफी रुग्णालयात उपचार घेत असलेली जगातील सर्वात लठ्ठ इजिप्तच्या महिलेच्या प्रकरणात अाता वेगळीच कलाटणी मिळत अाहे. ‘इमानवर उपचार करणारे बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. मुजफ्फर लकडावाला खोटारडे असून त्यांनी अापल्या बहिणीचे वजन घटवलेच नाही. उलट तिची काळजी न घेऊन आपली फसवणूक केली,’ असा अाराेप इमानची बहीण शायमाने एका संकेतस्थळावर व्हिडिओद्वारे केला आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने हे अाराेप फेटाळले अाहेत. इमानचे वजन घटल्याचा पुरावा देतानाच डाॅक्टरांची बदनामी करण्यासाठी अाराेप करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले अाहे. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुझैफा शेहाबी म्हणाले की,  ‘इमानचे  मूळ ५०० किलाे असलेले वजन अाता १७१ किलो झाले असून मंगळवारी सकाळीच ११ वाजता तिचे सीटी स्कॅन केले आहे. शायमाच्या अाराेपात तथ्य नाही. अामच्या रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिनची केवळ २०४ किलो वजन उचलण्याची क्षमता आहे. इमानचे सीटी स्कॅन करण्यात आले म्हणजे तिचे वजन खरंच कमी झाले आहे. २४ तासांत तिच्या चाचण्यांचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर इमानला वारंवार लकवा मारल्याचे मुख्य कारण स्पष्ट होईल’, असेही डॉ. शेहाबी यांनी सांगितले.   
 
घरी जाऊन काही झाले तर जबाबदार काेण?  
शायमा म्हणाल्या की, ‘इमानचे वजन ५०० किलाेवरून आता १७१ किलो झाल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. मात्र, ताे खोटा असून बऱ्याच दिवसांत इमानचे वजनच करण्यात आलेले नाही. माझ्या बहिणीचे वजन १०० किलोपेक्षा कमीच झाले नाही. डॉ. लकडावाला यांनी इमानचे वजन कमी करण्याचे आणि ठणठणीत बरी करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी तिला वर्षभर या ठिकाणी उपचार देणार होते. मात्र, आता अवघ्या तीन महिन्यांत इमान अाता कधीच चालू शकत नसल्याचे सांगत लवकरच तिला घरी सोडले जाईल, असे डाॅक्टर सांगत आहेत. मुळात इमानची प्रकृती अद्यापही सुधारलेली नाही. इजिप्तला जाऊन काही झाले तर त्याला जबाबदार कोण? रुग्णालय प्रशासन ही जबाबदारी घेईल का? डॉ. लकडावाला यांनी इमानचे आयुष्यच उद्ध्वस्त केले अाहे,’ असा अाराेप शायमा यांनी केला. 
 
शस्त्रक्रियेनंतर अारोप चुकीचा   
डॉ. लकडावाला म्हणाले की,   इमानच्या प्रकृतीची काळजी घेतली नसती तर ती अाज इतकी चांगली नसती. काेणताही अाधार न घेता ती अर्धा तास बसू शकते. मंगळवारी झालेल्या स्पीच थेरपीमध्येदेखील ती चार वाक्ये बाेलू शकली. सध्या तिला श्वासाेच्छ्वास करण्यासाठी अाॅक्सिजनची गरज लागत नाही तसेच इंजेक्शनची गरज नाही. इमानचे अाॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर अाता तिच्याकडे डाॅक्टरांनी लक्ष दिले नाही, असा अाराेप करणे चुकीचे अाहे.’  
 
कुटुंबीय इमानला साेडून जाण्याच्या विचारात हाेते : डाॅ. लकडावाला  
पंधरा दिवसांपूर्वी इमानचे नातेवाईक रुग्णालयावरच सर्व जबाबदारी साेपवून तिला येथेच साेडून परत जाण्याचा विचार करत हाेते. ते पुन्हा कधी येणार हे माहिती नव्हते. त्यामुळे रुग्णाला एकट्याला साेडून जाऊ शकत नाही, असे सांगून त्यांना रुग्णालय प्रशासनाने राेखले.  पॅरालिसिसच्या रुग्णाला फिजिअाेथेरपीची गरज कायम लागते. त्यामुळे  इमान अापल्या घरी राहिली किंवा तिची भाषा बाेलणाऱ्यांच्या  सान्निध्यात राहिली तर ते तिच्याच तब्येतीसाठी चांगले अाहे. पण ते इमानला का परत घेऊन जात नाहीत, हे अनाकलनीय अाहे. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या  उपचारांवर ते समाधानी नाहीत तरी ते तिला इथेच ठेवत अाहेत. जर तुम्ही उपचारांवर नाखुश अाहात तर मग तिला घेऊन का जात नाहीत’, असा प्रश्नही डाॅ. लकडावाला यांनी उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...