आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेला जामीन, पोलिस तपासातील त्रुटींचा फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बावीस कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी धर्मराज काळोखेला पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. काळोखेला मिळालेला जामीन हा मुंबई पोलिdivya marathi,police,सांच्या गुन्हे शाखेला धक्का मानला जात आहे. या आधी या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी बेबी पाटणकर हिला मुंबई सत्र न्यायालयाने १५ जुलै रोजी पाच लाख रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
सुनावणीदरम्यान काळोखेचे वकील अॅड. जयेश वाणी यांनी पोलिस तपासातील त्रुटी आणि विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायमूर्ती यू. बी. हेजीब यांनी काळोखेला जामीन मंजूर केला असून दर सोमवारी त्याला तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाता येणार नाही, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑगस्टला होणार असून या वेळी काळोखेच्या पोलिस ठाण्यामधील कपाटातून जप्त केलेल्या साडेबारा किलो एमडीच्या पुनर्तपासणीची परवानगी पोलिस मागणार आहेत. या पुनर्तपासणीला काळोखेच्या वकिलांनी अगोदरच विरोध केला आहे.

धर्मराज काळोखे हा एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत होता. ९ मार्च रोजी पोलिसांनी त्याच्या साताऱ्यातील घरी टाकलेल्या धाडीत ११० किलो एमडी ड्रग्जचा साठा सापडला होता. तसेच मुंबईतील त्याच्या पोलिस ठाण्यातील कपाटातही साडेबारा किलो एमडी जप्त करण्यात आले होते. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणी बेबी पाटणकर आणि इतरही पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणातील हा बारावा जामीन असून याआधी बेबी पाटणकरसह बेबी आणि धर्मराज काळोखेला मदत केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सर्व पोलिसांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तसेच अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या अारोपाखाली अटक असलेला बेबीचा मुलगा, सतीश पाटणकर, तस्कर सॅम्युअल आणि इतर तिघांनाही न्यायालयाने प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता.
जाणीवपूर्वक प्रकरण दाबल्याची चर्चा
काळोखेच्या जामिनानंतर आता हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या हातून पूर्णत: निसटल्याचे बोलले जात आहे. कारण न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात काळोखेकडून जप्त करण्यात आलेला हा १२२ किलो अमली पदार्थांचा साठा एमडी नसून तो चायनीज पदार्थांमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिस कर्मचारीच अडकल्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक संपवले जात असल्याचीही चर्चा आहे.