मुंबई- मुंबईतील महापालिकेच्या 'बेस्ट' च्या बस चालकाने शिफ्ट लावण्यावरून दोन वरिष्ठांवर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यातील दोघेही वरिष्ठ जखमी असून त्यांना नायर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शंकर माने असे या बसचालकाचे नाव आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर माने यानेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बेस्ट प्रशासनाने त्यालाही नायर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हा हल्ला आज सकाळी 10 च्या सुमारास मुंबईतील सेंट्रल बस डेपोमध्ये घडला. वरिष्ठांनी चुकीची शिफ्ट लावली आहे ती बदलून मिळावी असे मानेंचे म्हणणे होते. मात्र, त्यावेळी वरिष्ठांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथम मानेने दोन वरिष्ठांवर हल्ला केला त्यानंतर कोयत्याने वार केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर शंकर मानेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन वरिष्ठ व शंकर माने या तिघांवरही नायर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.