आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर ‘बेस्ट’चा संप मागे; मात्र दिवसभर मुंबईकर वेठीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऐन रक्षाबंधन आणि ‘बेस्ट’ दिनाच्या दिवशीच साेमवारी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करून मुंबईकरांना वेठीस धरले. रक्षाबंधनानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बेस्ट बस नसल्याने ऑटोरिक्षा आणि अन्य पर्यायी साधनांचा वापर करावा लागला. परंतु त्यासाठीही खूप खस्ता खाव्या लागल्याने मुंबईकर बेस्ट कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत होते. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  ‘मातोश्री’वर बैठक घेऊन कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांना आश्वासन दिले आणि संध्याकाळी बेस्टने संप मागे घेतला.   

पगार वेळेवर व्हावा म्हणून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बेस्टच्या कर्मचारी संघटना प्रशासनाशी बोलत होत्या. मात्र, तोट्यात असलेल्या बेस्टकडे पगारासाठी पैसे नसल्याने मनपापुढे हात पसरावे लागत होते. अखेर पगारासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारी संपाची हाक दिली. संप होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी रविवारी महापौर बंगल्यात बैठक घेतली. या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊनही बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.   

अखेर सोमवारी दुपारी पुन्हा  उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ आणि इतर पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या चर्चेत रविवारी मान्य केलेल्या मागण्याच पुन्हा ठेवण्यात आल्या आणि त्याच मान्यही करण्यात आल्या. 

ठाकरेंकडून दिलगिरी  
ठाकरे म्हणाले, मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत. कर्मचाऱ्यांचे पगार दहा तारखेपूर्वी होतील, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली आहे, असे आश्वासन देत बेस्टचा कारभार असाच सुरू राहिला तर एक दिवस बेस्ट बंद पडेल, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली. बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, तुमची जबाबदारी आम्ही घेतो, असे आवाहन  ठाकरे यांनी केले. त्यानंतर शशांक राव यांनी, उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी घेतली तर कामगारांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे,  आम्ही संप मागे घेतो, अशी घोषणा केली
बातम्या आणखी आहेत...