आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती योजनांवर अर्थसंकल्पात भर, द्राक्ष उत्पादन वाढवण्यासाठी सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या अर्थसंकल्पात काय असावे यासाठी विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये अनेक नावीन्यपूर्ण सूचना समोर आल्या असून कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याबरोबरच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजऐवजी अन्य उपाययोजना सुचवण्यात आल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

सात मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात काय असावे याची माहिती घेण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. औरंगाबाद, कोकण, नागपूर अशा काही ठिकाणी बैठका झाल्या असून मंगळवारी पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, पालिका आयुक्त आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित असतात. या बैठकांमध्ये अनेक नावीन्यपूर्ण योजना समोर आणण्यात आल्याची माहिती बैठकांना उपस्थित वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड दुष्काळ आहे. या दुष्काळातही शेतकरी तग धरून राहिला असता परंतु सहकारी संस्थांनी पैसे बुडवल्याने शेतकरी डबघाईला आल्याचे सांगून हा अधिकारी म्हणाला, बीड, उस्मानाबाद अशा ठिकाणी अनेक सहकारी संस्था आहेत. या संस्थांमध्ये शेतकऱ्यांनी आपली कमाई ठेवली होती. परंतु या संस्था बंद झाल्याने त्यांच्यावर मोठा कठीण प्रसंग उद्भवला. संस्थांच्या संचालकांची चौकशी झालीच नाही. मात्र, सरकारकडून कर्जावर कर्ज घेण्याचे अयोग्य धोरण राबवण्यात आले. यामुळे संस्थांचा फायदा झाला मात्र शेतकरी बुडाला. त्याचाच परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या वर्षी या संस्थांच्या संचालकांची चौकशी करावी, असा अहवालही एका अधिकाऱ्याने दिला होता. मात्र, तो थंड्या बस्त्यात पडला असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

शेतकऱ्यांना फक्त आधुनिक बी-बियाणे न देता त्यांचे उत्पादन वाढून त्यांना जास्त पैसे कसे मिळतील याचा विचार यंदाच्या अर्थसंकल्पात करावा, अशा सूचना अनेकांनी दिल्या. यासाठी शेती कशी केली पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, उत्पादन वाढल्यास त्याला योग्य भाव कसा मिळेल याबाबतच्या योजना तयार करण्याच्या सूचना आल्या आहेत.

‘विदेशी तज्ज्ञांचे मार्गदर्शन’
नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु द्राक्षाच्या फांद्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा कापाव्यात, ज्यामुळे पुढील वर्षी मोठी आणि एकाच आकाराची द्राक्षे येतील याकडे लक्ष दिले पाहिजे आणि यासाठी यात तज्ज्ञ तरुणांची निर्मिती करावी, अशी सूचना पुढे आली आहे. त्यासाठी परदेशात जेथे द्राक्षे निर्यात केली जातात तेथील तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. राज्य सरकार गंभीरतेने याचा विचार करत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

घरेलू कामगारांनाही व्यवसाय आधारित प्रशिक्षण
राज्यात अनेक घरांमध्ये महिला धुणी-भांडी करण्याचे काम करतात. अशा महिलांना ब्यूटिशियनचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यास त्यांना याचा फायदा होईल. दिल्लीमध्ये असे प्रशिक्षण देण्यात आले असून त्याचा घरकाम करणाऱ्या महिलांना चांगला फायदा झाला आहे. केस कापणे, पेडिक्यूअर, मेनीक्यूअर अशा छोट्या-छोट्या गोष्टी शिकवल्या तर त्या घरातील महिलांना ही सेवा देऊन आणखी कमाई करू शकतात. त्यामुळे सरकार या योजनेवरही विचार करत आहे.