मुंबई- माजी राज्यमंत्री आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जवखेड खालसा येथील दलित कुटुंबाच्या हत्येप्रकरणी सखोल तपास करावा, अशी मागणी केली. या सदंर्भात
आपण पोलिस महासंचालकांना योग्य ते निर्देश दिले असून या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींवर कारवाई करावी, असे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी गिरकर यांनी गेल्या वर्षभरात राज्यातील घडलेल्या दलित अत्याचाराच्या प्रकरणांची आकडेवारी सादर केली. मुख्यमंत्र्यांनी अशा घटना निंदनीयच नव्हे तर माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, अशा शब्दात आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
गुरूनानक देव जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा- गुरूनानक देव यांनी दिलेल्या सर्व धर्मांचा आदर करण्याच्या शिकवणुकीमुळे ते इतर धर्मियांसाठी देखील आदर्श ठरले, अशा शब्दात गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शीख धर्माच्या स्थापनेमुळे गुरू नानक देव यांनी समाजमनात एक नवीन चेतना निर्माण केली. विविध धर्मातील चांगल्या बाबी स्वीकारून त्यांनी व्यापक अशा शीख धर्माची स्थापना केली. कोणत्याही बंधनाशिवाय शाश्वत सत्य जाणून त्या आधारावरील धर्म स्थापन करून त्यानुसार आचरण करण्याची त्यांनी प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या अनुयायींना दिलेले दहा सिद्धांत आजही आहार-विहार आणि आचरणासंबंधी मार्गदर्शक ठरतात. गुरू नानक देव यांनी दिलेल्या या दहा सिद्धांताचा प्रत्येकाने अंगीकार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.