आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यज्ञकार्यासाठी माेठे दान; पण शेतकरी मदतीकडे पाठ, या वृत्तीला कंटाळलाे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘महाराष्ट्रातील दुष्काळाचा मुकाबला करण्यात राज्यातील फडणवीस सरकार पूर्णत: अपयशी ठरले असून त्यांनी दुष्काळ प्रश्नाला ‘पर्यटनाचे’ स्वरूप दिले आहे,’ असा अाराेप अाध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. गोवंश हत्याबंदी चुकीची आहे. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात वेगाने कामे होत होती.. आय हेट गॉडमॅन, मला संतपणाचे ओझे वाटू लागले आहे.. मी हिंदू धर्म कधीही सोडणार नाही.. मात्र, हिंदू धर्म परत सनातन धर्माकडे वाटचाल करणे हे धोकादायक आहे.. अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी बाेलून दाखवली. काेल्हापूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भय्यू महाराजांनी सार्वजनिक कार्यक्रमातून निवृत्तीची घाेषणा केली हाेती. त्याबाबत महाराजांशी झालेला संवाद..

प्रश्न : तुम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारणार, अशी चर्चा सुरू आहे...
भय्युजी : हिंदू धर्म परत सनातन धर्मांकडे चालला अाहे. ही प्रक्रिया अशीच चालू राहिल्यास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे लोक बौद्ध धर्म स्वीकारतील, असे मी म्हणालो होतो. मात्र, धर्मांतराचा इशारा िदलेला नाही. मी कदापि धर्मत्याग करणार नाही. हिंदू धर्मात राहूनच निरंतर समाजोपयोगी काम करत राहणार अाहे.

प्रश्न : संन्यासाची घोषणा अचानक कशी?
भय्युजी : माझ्या सूर्योदय परिवाराचे महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेशात हजारो समाजोपयोगी प्रकल्प चालू आहेत. आजकाल भक्त दान देताना सौदा करू पाहतात. हे भक्त अापले काळे धन ट्रस्टला दान करतात. त्या बदल्यात ४० टक्के पैसा (व्हाइट मनी) परत मागतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा दुष्काळग्रस्त यांच्या मदतीसाठी लोकांकडे पैसे नाहीत. यज्ञयागासारख्या धर्मकार्याला हवे तेवढे पैसे देतात. समाजाच्या या वृत्तीला मी कंटाळलो अन् संन्यासाची घोषणा केली.

प्रश्न : महाराष्ट्रातील दुष्काळ िनवारणाविषयी तुम्हाला काय वाटते?
भय्युजी : फडणवीस सरकारने राज्यातल्या दुष्काळाचे अक्षरश: ‘पर्यटन’ करून ठेवले आहे. काम कमी अाणि प्रसिद्धी जादा. नाले, बंधारे खोलीकरणाच्या कामांचा गवगवाच अधिक होतोय. कामे करताय तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? गावशिवाराकडे या सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. गोवंश हत्याबंदीमुळे शेतकरी मोठ्या कोंडीत सापडला आहे. त्याच्या आर्थिक नाड्या बंद झाल्या आहेत.
प्रश्न : समाजोपयोगी प्रकल्पाचे काय हाेणार?
भय्युजी : मला माहिती नाही. मी आता आश्रमात जाणे बंद केले आहे. यापुढे मी एकही नवा प्रकल्प हाती घेणार नाही. पूर्वी सुरू केलेले प्रकल्प चालूच राहतील. माझ्याकडे येणाऱ्यांना सल्ला यापुढेही देत राहणार. त्यातून मी संन्यास घेतलेला नाही अाणि कधी घेणारही नाही. सल्ला देणे हा माझा श्वास आहे. त्याचीही समाजाला मोठीच गरज आहे.

प्रश्न : तुम्ही कर्जात अडकला आहात म्हणून संन्यास घेताय, अशी चर्चा अाहे...
भय्युजी : ते कारण खरे आहेच, पण मी कर्जात का बुडालो त्याची माहिती घ्या. आमची चारशे बिघे जमीन होती. आता ४० िबघे राहिली. इंदूरमध्ये भारतमाता मंदिर अाणि सुखलियाचा आश्रम स्वत:च्या जमिनीवर बांधला. इतर बुवा, महाराजांचे हजारो एकरांचे आश्रम उभे राहिले. माझी मात्र जमीन कमी कमी होत गेली. चमत्कार दाखवणाऱ्या बाबांच्या झोळीत समाज भरभरून दान टाकतोय. माफ करा. पण तसा बाबा मी बनू शकत नाही. विनोबा भावे हे खरे संन्यासी, ज्यांनी हजारो एकर जमीन दानासाठी मिळवली आणि आजचे संन्यासी स्वत:च्या आश्रमासाठी जमिनी हडप करतात..आय हेट गाॅडमॅन... मला माझ्या संतपणाचे ओझे वाटू लागले म्हणूनच मी संन्यास घेतलाय.

प्रश्न : भाजप सरकार आल्याने तुमचे आर्थिक स्रोत आटल्याची चर्चा अाहे?
भय्युजी : असं नाही. सर्व राजकीय पक्षांत मला मानणारे आहेत. मोदींचाही महिन्यातून एकदातरी फोनवर संवाद व्हायचा. पण एक खरे आहे. िवलासराव अाणि सुशीलकुमार यांच्या सरकारात कामांना वेग हाेता. एखादे सामाजिक काम घेऊन गेले की िनश्चित व्हायचे. फडणवीस सरकारच्या काळात तशी स्थिती नाही. जलसंधारणाच्या कामात आमच्या सूर्योदय ट्रस्टने बरेच काम केले. पण आम्हाला या सरकारने कधी पुसलेही नाही.
बातम्या आणखी आहेत...