आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव : राज्यपाल सी. विद्यासागर राव, नेमाडे आठवणीत रमतात तेव्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले प्रख्यात साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी चहापान कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
मराठवाड्याच्या मातीत अनेक वर्षे घालवलेल्या या दोघा दिग्गजांनी या भेटीत मराठवाडा मुक्तिसंग्राम, विद्यापीठ नामांतर चळवळ आणि तत्कालीन मराठवाड्याच्या शैक्षणिक चळवळीतील स्थित्यंतरावर बराच वेळ गप्पा मारत रविवारी जुन्या आठवणींना उजाळा दिला. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भालचंद्र नेमाडे यांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

आपणांस ज्ञानपीठ मिळाले हा संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले. तर ‘राज्याच्या प्रथम नागरिकाकडून सत्कार होतोय हा आपल्याकरिता बहूमान आहे’, असे नेमाडे म्हणाले.

नेमाडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे ‘बीएसस्सी’चे शिक्षण नांदेड येथे झालेले आहे. ऐंशीच्या दशकात काही वर्षे मराठवाड्याच्या भूमीत घालवलेल्या या दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नेमाडे यांनी ‘कोसला’चा इंग्रजी अनुवाद असलेली `ककून' ही कादंबरी राज्यपालांना भेट दिली.राज्यपालांच्या पत्नी विनोदा तसेच नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा तसेच नेमाडे यांचे पुत्र जन्मेजय, स्नुषा व नाती यावेळी उपस्थित होत्या.
रश्दींबाबतच्या विधानांवर ठाम
सलमान रश्दी, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर यांच्याबाबत पूर्वी केलेल्या वक्तव्यांवर मी आजही ठाम आहे. ज्ञानपीठ पुरस्कार परत करा, असे म्हणणारे पुण्याच्या देशमुख आणि कंपनी प्रकाशनाचे विनय हर्डीकर यांचे आवाहन विकृत स्वरुपाचे आहे, अशी प्रतिक्रिया भालचंद्र नेमाडे यांनी या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केली.