मुंबई - लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना आपल्या मंत्रिमंडळात तसेच कार्यकारिणीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणजे याआधी विजयकुमार गावित यांच्या जागी जितेंद्र आव्हाड यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आणि आता भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्षपदावरून बदलत त्यांच्या जागी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची निवड करण्यात येणार आहे. या बदलात तटकरेंचे रिकामे झालेले जलसंपदा खाते जाधवांना देण्यात येईल.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अनेक बदलांसाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणजे बुधवारी पक्षाच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत हा निर्णय जाहीर होईल. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर एक नजर टाकण्यात येणार आहे. या वेळी प्रदेश कार्यकारिणीतही फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. कार्यकारिणीच्या सभेला सर्व नेते, मंत्री, पदाधिकारी यांना बोलावण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्यासाठी गेल्या आठवड्यात पवारांनी जंग जंग पछाडले. राष्ट्रवादीच्या अंदाजानुसार मुख्यमंत्री बदलले असते तर पवारांनी आपल्याही मंत्रिमंडळात फेरबदलाचा निर्णय घेतला होता. मात्र मुख्यमंत्र्यांना हटवण्याचे पवारांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही आणि पुढच्या त्यांच्या डावपेचांनाही खीळ बसली.
बदल केले, पण फायदा किती?
वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीने संघटना तसेच मंत्रिमंडळात खांदेपालट केला. मधुकर पिचडांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करून त्यांना आदिवासी मंत्रिपद दिले. भास्कर जाधव यांचे नगरविकास राज्यमंत्रिपद काढून त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. तर जाधवांचे मंत्रिपद रत्नागिरीच्या उदय सामंतांना दिले, तर बबनराव पाचपुते, लक्ष्मणराव ढोबळेंच्या जागी अनुक्रमे पिचड व दिलीप सोपल यांची निवड केली. त्याचबरोबर शशिकांत शिंदे, सुरेश धस यांना संधी देताना रामराजे निंबाळकर व प्रकाश सोळंके यांना डच्चू दिला. एवढे बदल करूनही लोकसभा निवडणुकीत फटका बसलाच.
छगन भुजबळ वाचले
मोठ्या फेरबदलात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचेही मंत्रिपद काढून घेण्याचा पवार विचार करत होते. भुजबळांच्या मंत्रिपदाचाही तसा विचार करता पक्षाला खूप फायदा झालेला नाही. तसेच त्यांचे ओबीसी कार्डही प्रभावी ठरलेले नाही. नाशिक जिल्ह्यावरची भुजबळांची कमी होत चाललेली पकडही राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. नाशिकमध्ये आधी मनसे आणि आता शिवसेनेची ताकद वाढत चालल्यामुळे पक्षाला विधानसभेत किती यश मिळेल, याविषयी शंका वाटत आहे. मात्र आताच्या फेरबदलात भुजबळांचे मंत्रिपद वाचण्याचीच चिन्हे आहेत.