आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपासून मुंबईत पाळला जातोय भिंद्रनवालेचा स्मृतिदिन, मुंबईत फलक झळकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्रोळी परिसरात एका गुरुद्वारावर झळकलेले भिंद्रनवालेचे फलक. - Divya Marathi
विक्रोळी परिसरात एका गुरुद्वारावर झळकलेले भिंद्रनवालेचे फलक.
मुंबई - खुद्द पंजाबमध्ये आता विस्मृतीत जात असलेल्या स्वतंत्र खलिस्तानवादी अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा स्मृतिदिन गेल्या तीन वर्षांपासून चक्क मुंबईत साजरा केला जात आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका गुरुद्वाराच्या भिंतीवर शनिवारी संध्याकाळी झळकलेला भिंद्रनवालेचा एक अतिभव्य फलक चर्चेचा विषय ठरला आहे. अशा पद्धतीने फलक लावून अतिरेक्यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरापैकी एक असलेल्या विक्रोळीच्या टागोरनगर परिसरात बांधकामाधीन असलेल्या एका गुरुद्वाराच्या भिंतीवर लागलेल्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेच्या फलकाने एका वेगळ्याच चर्चेला ऊत आला आहे. विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या परिसरात शीख समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहत असल्याने भिंद्रनवालेच्या विघटनवादी विचारांचा प्रभाव या परिसरातल्या तरुणांमध्ये वाढलाय का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी जून रोजी हा फलक या परिसरात लावला जात असल्याची माहिती विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश देसाई यांनी दिली. मात्र फलकाबाबतची माहिती आम्हाला मिळताच आम्ही तिथे जाऊन तो फलक हटवण्यास सांगितले. त्यानंतर संबंधितांनी तो फलक हटवला असल्याची माहितीही देसाईंनी दिली. फलक लावण्याचे नेमके प्रयोजन काय याबाबत आपण काही चौकशी केली का? या प्रश्नावर देसाई म्हणाले की, फलक लावण्याचे नेमके प्रयोजन आपणास ठाऊक नाही, मात्र त्या फलकावरून काही वाद होऊ नयेत यासाठी आम्ही ही कारवाई केल्याचे देसाईंनी स्पष्ट केले.
भिंद्रनवाले अतिरेकी की हुतात्मा?
तत्कालीनपंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानंतर जून १९८४ मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारअंतर्गत सुवर्णमंदिरात घुसून भारतीय लष्कराने भिंद्रनवालेचा खात्मा केला होता. सरकारच्या लेखी जरी भिंद्रनवाले हा अतिरेकी असला तरी शीख समाजातील एक गट मात्र त्याला हुतात्मा मानतो. म्हणूनच हा दिवस आजही शीख समाजातील काही संघटांमार्फत शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
हे उदात्तीकरण करणे थांबवा : संजय राऊत
शिवसेनेचेखासदार संजय राऊत यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. ज्यांनी देश तोडण्याची भाषा केली त्यांना अशा पद्धतीने प्रतिष्ठा मिळणे दुर्दैवी आहे. या संघर्षाची मोठी किंमत देशाने चुकवली आहे. एक माजी पंतप्रधान आणि एका माजी लष्करप्रमुखाचा यात बळी गेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राऊत यांनी केली.