आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhiwandi Toll Charges Increases Within One Month ; Toll Drama Continue

भिवंडीत टोलचे दर महिन्यात वाढणार ; टोलचा झोल सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रस्त्यांची सुविधा दिल्याबाबत टोल वसूल करणा-या बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह केले जात असतानाच आणखी एक टोलचा झोल समोर आला आहे. नवीनच सुरू झालेल्या भिवंडी मार्गावरील दोन रस्त्यांवरील टोलमध्ये एका महिन्यातच पाच ते 40 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे.

सुप्रीम इन्फ्राने (सुप्रीम मनोर वाडा भिवंडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.ची उपकंपनी) मनोर ते वाडा आणि वाडा ते भिवंडी रस्ता ‘बीओटी’ तत्त्वावर तयार केला आहे. या प्रकल्पासाठी कंपनीने 430 कोटी रुपये खर्च केले आहेत. या कंपनीलाच टोल वसूल करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. सोमवार म्हणजेच चार मार्चपासून कंपनीने या दोन्ही रस्त्यांवर टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे सध्या सुरू असलेला दर हा फक्त एकच महिन्यासाठी असून एक एप्रिलपासून टोलच्या दरात पाच ते 40 रुपयांनी वाढ करण्यात येणार असून ही वाढ मार्च 2016 पर्यंत कायम राहील. सध्या या दोन्ही रस्त्यांवर कार- जीपसाठी 25 रुपये, मिनीबससाठी 45 रुपये, ट्रक, बससाठी 90 रुपये, अवजड वाहनांसाठी 150 रुपये आणि ट्रक, ट्रेलरसाठी 200 रुपये कर आकारण्यात येत आहे. हा दर एक एप्रिल 2013 पासून बदलणार असून पाच रुपये, दहा रुपये, 20 रुपये, 30 रुपये आणि 40 रुपये अशी अनुक्रमे वाढ करण्यात येणार आहे.

बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. एसएमएसचेही उत्तर त्यांनी दिले नाही.
म्हणे सुविधा वाढल्याने दर वाढविण्यात आले
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांशी संपर्क साधला असता, प्रथम अशी वाढ करणे योग्य नाही असे सांगण्यात आले. परंतु नंतर सांगितले की, रस्त्यावर आणखी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याने टोलचा दर वाढवला जात आहे. सुविधा न देताच टोल का सुरु केला असा प्रश्न केला असता अधिका-याने उत्तर दिले नाही.