आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडून या, भ्रष्टाचार मुद्दे सभागृहात सोडवा: हायकोर्टाचा ‘आप'ला सल्‍ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वारंवार याचिका करण्याऐवजी आम आदमी पक्षाने निवडणूक लढवावी आणि स्वबळावर निवडून येत भ्रष्टाचारासारखे मुद्दे विधान भवनात बसून सोडवावेत, असा उपहासात्मक सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध चौकशीची मागणी करणारी याचिका "आप'ने दाखल केली आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावर याआधीही पक्षाने याचिका दाखल केली होती.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाले असून, त्याच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका "आप'कडून उच्च न्यायालयात काही महिन्यांपूर्वी दाखल करण्यात अाली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच सक्तवसुली संचालनालय या तपास यंत्रणांना चौकशीचे आदेश देत याचिका निकाली काढली होती. त्यानुसार भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांच्या विरोधात गुन्हेही दाखल झाले. एसीबी आणि ईडीने आतापर्यंत ९ गुन्हे दाखल केले असून, चार प्रकरणांच्या चौकशीचे अहवालही कोर्टाला सादर करण्यात आले आहेत.
सोमवारी पुन्हा याबाबतची याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर आली. तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एसीबी व ईडीच्या त्या चौकशी अहवालांची प्रत मिळावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणीदरम्यान यावर निर्णय घेऊ असे सांगितले. तसेच ही याचिका आपने केली आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास येताच पक्षाने स्वबळावर निवडून येऊन भ्रष्टाचारासारखे मुद्दे विधान भवनात सोडवावेत, असा उपहासात्मक शेरा मारला. तसेच याचिकेत यापूर्वी दुसऱ्या न्यायमूर्तींकडून देण्यात आलेल्या सर्व निर्देश आणि आदेशांची माहिती देण्यास सांगितले. पुढील सुनावणी २८ रोजी आहे.