आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांचा कोटींचा ‘हवाला’: किरीट सोमय्यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतात तोट्यात सुरू असलेल्या कंपनीच्या नावाने परदेशात पाच-सहा कंपन्या सुरू करून कोळसा खाण घेण्यासाठी छगन भुजबळ यांनी अनिल वस्तावडे याच्या मदतीने हवालामार्फत 100 कोटी रुपये परदेशात नेल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत केला. भुजबळ यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी समीर भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग कंपनीचा ताळेबंद आणि कंपनीच्या परदेशातील खात्यांची कागदपत्रे सादर केली. ते म्हणाले की, आर्मस्ट्रॉँग कंपनी वीजनिर्मितीच्या क्षेत्रात आहे. नाशिक येथे वीज प्रकल्प आहे; परंतु तेथे वीजनिर्मिती होतच नाही. तोट्यात असलेल्या या कंपनीने इंडोनेशियातील जकार्ता येथे कोळशाच्या खाणी विकत घेतल्या. यासाठी मधू कोडा यांचा सहयोगी अनिल वस्तावडे आणि तेलगी प्रकरणातील अंतिम तोतला यांची मदत घेतल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.


छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे मधू कोडा- 15 जुलै 2010 ते 1 ऑगस्ट 2010 दरम्यान छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी जकार्ता येथे खाणीसंदर्भात बैठका घेतल्या. या बैठकांना झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांचा सहयोगी आणि हवाला किंग वस्तावडे व तोतला उपस्थित होते. त्यांच्या मदतीने भुजबळ कुंटुंबीयांनी 100 कोटी रुपये हवालामार्फत परदेशात नेले. छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे मधू कोडा आहेत आणि अनिल वस्तावडे हा हसन अली आहे. भुजबळांच्या भ्रष्ट व्यवहाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी सुरू आहे. आता हे प्रकरण समोर आल्याने अंमलबजावणी संचालनालयातर्फे भुजबळांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे केल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

आरोप बिनबुडाचे, सर्व व्यवहार नियमाने : भुजबळ
छगन भुजबळ यांनी आरोप तद्दन खोटे असल्याचे म्हटले आहे. इंडोनेशियात जकार्ता येथे 25 ते 30 कोटी रुपयांची एक कोळसा खाण आम्ही विकत घेत आहोत. हा व्यवहार अजून पूर्ण झाला नसल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, यासाठी आमच्या अन्य कंपन्यांतील पैसे आरबीआयच्या परवानगीनेच परदेशात नेले. आम्ही गैरव्यवहार केलेलाच नाही. जकार्ता येथे झालेल्या बैठकीबाबत स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणाले की, सोमय्या जी तारीख सांगतात त्या कालावधीत मी आणि समीर येथेच होतो. विधानसभेचे अधिवेशन सुरू होते आणि सुटीच्या दिवशी मी पुण्याला होतो. मी जकार्ताला आजवर गेलेलो नाही आणि सिंगापूरलाही 20 वर्षांपूर्वी गेलो होतो. समीर जकार्ताला कामासाठी गेला होता, परंतु त्या वेळी तो अनिल वस्तावडे का कोण त्याला भेटला नाही. आम्ही अनिल वस्तावडेला ओळखतही नाही.


अंतिम तोतला स्मगलर नाही- बैठकीला अंतिम तोतला उपस्थित होता असाही आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यावर भुजबळ म्हणाले, तोतला हा स्मगलर नाही. तेलगी प्रकरणातही त्याचे नाव आले होते. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याने त्याला गोवण्यात आले होते. सर्वोच्च् न्यायालयानेही त्याला निर्दोष सोडले आहे. मात्र, आमची बैठक झाली नसल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. आरोप राजकीय आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सोमय्या करीत आहेत. आता त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याबाबत वकिलांशी चर्चा करू, असेही भुजबळ म्हणाले.