आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhuvikas Bank Employee May Given Self Retirement

भूविकास बँक कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील 29 जिल्हा भूविकास बँकांमधील कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी सभागृहात दिली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून विचारला होता. तसेच या बँकांच्या कर्मचार्‍यांचे प्रश्न आणि विलीनीकरणाच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. या बैठकीला सर्वपक्षीय गटनेते आणि आमदारांनी उपस्थित राहून आपल्या सूचना द्याव्यात, असेही सहकामंत्र्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

राज्यात 28 जिल्हा भूविकास बँका आणि 1 फेडरल बँक असून यामार्फत शेतकर्‍यांना देण्यात येत असलेले कर्ज वितरण पूर्ववत सुरू व्हावे, अशी लघुगटाने केलेली शिफारस मान्य करण्यात यावी, असा मुद्दा मुनगंटीवार यांनी उपस्थित केला, तर या बँका जगवण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली.यावर उत्तर देताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, या बँकाना गेल्या 12 वर्षांपासून नाबार्डकडून पुनर्वित्त प्राप्त होत नसल्याने बँकेचा कर्ज पुरवठा पूर्णत: बंद आहे. कर्जवसुलीच्या माध्यमातून केवळ शासन हमीवरील जबाबदार्‍या आणि व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यात येतो. मात्र, या बँकेतील कर्मचार्‍यांचे पगार व्हावेत, तसेच त्यांना व्हीआरएस मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बँकाची मालमत्ता तपासून त्यानंतर शक्य असल्यास विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात येईल. मात्र, ज्यांनी बोगस कर्जे दिली असतील त्यांच्यावर कारवाईचा इशारा पाटील यांनी दिला.

तर याबाबतच्या सर्व प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.