मुंबई - राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाले. मंत्र्यांना त्यांची खातीही वाटून दिली गेली. एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आपल्या गावी नागपुरात जाऊन नागरी सत्कारही घेतला. पण इकडे पदावर येऊन ४८ तास उलटत नाहीत तोच राज्यात त्यांच्यापुढे अनेक आव्हानांचा डोंगर उभा ठाकला आहे. यातील काही पक्षांतर्गतही आहेत. एकंदर नव्या मुख्यमंत्र्यांची चहुबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे.
मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. पंढरपुरात रविवारी पुन्हा त्यांनी आपल्या भावनेला वाट करून दिली. त्यातच शिवसेनेनेही फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यातच जवखेडेच्या दलित हत्याकांडाच्या निमित्ताने नक्षलवादी राज्यात घातपात घडवण्याची भीती व्यक्त होत आहे. गृह खाते स्वत:कडे ठेवणा-या मुख्यमंत्र्यांपुढे कायदा सुव्यवस्थेचेही आव्हान आहे.
खडसेंची रुखरुख कायम
ओबीसी मुख्यमंत्री व्हावा ही राज्यातील बहुजनांची इच्छा
ओबीसी व बहुजनांना आपला मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा होती. कारण ओबीसी व बहुजनांमुळेच भाजपला बळ मिळाले आहे, असे सांगत राज्याचे महसूल-कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रिपद हुकल्याची अप्रत्यक्ष खंत व्यक्त केली. तथापि, खडसे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या नेमणुकीच्या वेळी जातीपातीचे राजकारण झाले नाही. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्तिकीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
सत्तेत सहभागासंबंधी शिवसेनेशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
गोहत्या बंदीसाठी प्रयत्न : अंधश्रध्दा कायदा रद्द केला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून पाठिंब्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. गोहत्या बंदी कायद्यासाठी प्रयत्न करणार आहोत. उस दरासंदर्भात राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खडसे म्हणाले.