मुंबई- बिहार पोलिस दलात कार्यकरत असलेले व दबंग,
सिंघम, डॅशिंग IPS अशी ओळख मिळवलेले व तरूणाईत कमालीचे लोकप्रिय असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिपदीप लांडे यांना अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र केडर दिले आहे. गृहमंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, लांडे यांना महाराष्ट्रात तीन वर्षासाठी पाठवले गेले आहे.
आपल्याला माहित असेलच की, शिपदीप लांडे हे मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
पुण्यातील पुरंदरचे आमदार व राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची एकुलती एक मुलगी ममता हिचा विवाह दोन वर्षापूर्वी शिवदीप यांच्यासमवेत झाला होता. मार्च महिन्यात शिवदीप लांडे यांनी आपल्याला महाराष्ट्र केडर मिळावे यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने विनंती केली होती. त्यानंतर गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडे यांच्या अर्जाची दखल घेत, राज्याचे पोलिस महासंचालकांना अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यात लांडे यांना स्वगृही केडर मिळाले आहे.
शेतकरी कुटुंबातील आहेत शिवदीप-
- शिवदीप लांडे हे अकोला जिल्ह्यातील पारस (ता. बाळापूर) येथील रहिवासी आहेत. 29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी येथे शिवदीप यांचा जन्म झाला.
- शिवदीप शेतकरी कुटुंबातील असून, त्यांची आई गीताबाई सध्या अकोला जिल्हा परिषदेत सदस्य तर भाऊ कालिंद हे पारसला ग्रामपंचायत सदस्य आहेत. बहीण कुंजन पाटील या गृहिणी आहेत.
- शिवदीप यांनी शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी मिळविली आहे.
- मुंबईत प्राध्यापक म्हणून काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी सुरु केली.
- सुरुवातीला ते केंद्रीय उत्पादन व शुल्क विभागात रुजू झाले. कस्टममध्ये त्यांची पहिली नियुक्ती उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून कोलकाता विमानतळावर झाली.
- त्यादरम्यान ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची 2005 मध्ये बिहार कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.
- पहिली पोस्टिंग बिहारच्या जमालपूर जिल्ह्यातील मुंगेर येथे झाली. त्यानंतर त्यांना पाटणा शहरात पोलिस अधीक्षकपदी नेमण्यात आले.
बिहारी युवकांच्या गळ्यातील बनले होते 'ताईत'-
- आपल्या दबंग कामगिरीमुळे शिवदीप हे पाटणातील युवकांच्या गळ्यातील 'ताईत' बनले. हिंदी मीडियासाठीसुद्धा ते 'हीरो' ठरले.
- त्यांच्या दबंगगिरीने पाटण्यातील गुन्हेगारी जगताला सळो की पळो करून सोडले. त्याची दखल घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लांडे यांना पटण्याचा पोलिस अधीक्षक बनविले.
- त्यानंतर लांडे यांनी तेथील गुंडगिरी, अवैध व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या. त्यांच्याविरुद्ध त्यांनी धडक मोहीम उघडली.
- त्यांच्या या कामगिरीचे सत्ताधारी पक्षच नव्हे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकजनशक्ती पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही जाहीर सभांमधून कौतुक केलेले आहे.
- याचदरम्यान, दबंग, सिंघम अशी ओळख निर्माण केली. तसेच डॅशिंग काम करीत राहिल्याने शिवदीप लांडे आख्ख्या बिहारच्या गळ्यातील ताईत बनले होते.
- तरूण-तरूणी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी ताटकळतात. मात्र आता शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजेच महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत. लवकरच त्यांना बिहार पोलिस दल निरोप देईल.
शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारेंचे जावई आहेत शिवदीप लांडे-
- आयपीएस शिवदीप लांडे हे शिवसेनेचे नेते व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
- 10 वर्षे बिहारमध्ये सेवा केली आता महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी येथे या असा तगादा शिवतारे यांनी लांडे यांच्यामागे लावला होता. त्यानुसार लांडे यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अर्ज केला होता.
- लांडे यांनी बिहारच्या गुन्हेगारी विश्वात दहशत बसवली आहे. अशा डॅशिंग अधिका-याची महाराष्ट्राला गरज आहे.
- शिवदीप यांनी महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण किंवा दहशतवादविरोधी पथकात काम करावे अशी आमची इच्छा आहे, असे सांगत शिवतारे यांनी जावई शिवदीप यांच्या स्तुतीसुमने उधळली होती.
- शिवदीप आपला जावई असल्याचा सार्थ अभिमान आहे असेही शिवतारे म्हणाले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, दबंग, सिंघम शिवदीप लांडेंचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)