आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birth Anniversary Of Balasaheb, But Uddhav Thackeray Talked On Savarkar

जयंती बाळासाहेबांची, मात्र उद्धव ठाकरेंनी केले सावरकरांचे गुणगान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी राज्यभरातील हजारो शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर येऊन त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मृतीस्थळाजवळ अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात आयोजित
मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचे
गुणगान गात त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. त्यामुळे जयंती बाळासाहेबांची की
सावरकरांची, असा प्रश्न उपस्थितांच्या मनात येत होता.

‘शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी वाडगा घेऊन फिरणार नाही. स्मारक म्हणजे नुसता पुतळा नव्हे, माझ्या कल्पना काही वेगळ्या आहेत; परंतु त्यासाठी मी कोणाचेही उंबरठे झिजवणार नाही, अजिबात नाही. जर होणार असेल तर दिमाखात आणि शानदारपणेच होऊ द्या,’ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सरकारनेच जागा स्वतःहून द्यावी, असे सुचवले.
उद्धव म्हणाले, ‘सत्तेत सहभागी असलो तरी शिवसेनेची शिव आरोग्य सेवा येत्या आठ-दहा दिवसांत सुरू करणार आहे. मुलांच्या दप्तराचे ओझे कमी कसे करावे हे मी सप्रमाण दाखवले आहे. काही जण आता दप्तरमुक्त योजना सादर करीत आहेत,’ असे म्हणत उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावरही टीका केली.
छायाचित्रांतून पाच कोटी ११ लाख : उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या विक्रीतून पाच कोटी ११ लाख रुपये जमल्याची घोषणा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या वेळी केली. ही सर्व रक्कम दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.
मोदींना कानपिचक्या
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कशी शपथ घेतली, सेल्युलर जेलमध्ये कोलू कसा चालवला, याबाबत माहिती देत उद्धव यांनी शिवसैनिकांमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न केला. सावरकरांना न मागता भारतरत्न दिले पाहिजे, अशी मागणी करतानाच ‘रत्नाची निवड करणारा खरा पारखी असतो,’ असे सांगत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कानपिचक्या दिल्या.