आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Always Deman Seperate Vidharbha Says New Party President Devendra Phadnavis

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर भाजप ठाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजप नेहमीच छोट्या राज्यांचे समर्थन करते. छोटी राज्ये असल्यास त्यांचा विकास होऊ शकतो म्हणून वेगळा विदर्भ हवा या मागणीवर आम्ही ठाम आहोत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही वेगळ्या विदर्भाचा ठराव पास करण्यात आल्याचे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी वेगळी राज्ये, मनसेचा युतीत समावेश आणि भाजपच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीबाबत आपली मते मांडली.


फडणवीस म्हणाले, वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्रात रालोआ सरकार असताना तीन राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यापैकी छत्तीसगड आज सगळ्याच बाबतीत आघाडीवर आहे. क्षेत्रीय अस्मिता म्हणजे देशाच्या एकात्मतेला आमचा विरोध आहे असे नाही. त्यामुळेच आम्ही वेगळ्या तेलंगणालाही समर्थन दिले आहे आणि ती आमची कमिटमेंट आहे.

विरोधकांनी एकत्र यावे
महायुतीत मनसेला घेणार का? या प्रश्नावर फडवीस म्हणाले की, भाजप-शिवसेना आणि रिपाइंची युती मजबूत आहे. आगामी निवडणुका आम्ही एकत्रच लढवणार आहोत. काँग्रेस- राष्‍ट्रवादीला स्वबळावर सत्ता मिळाली नसून विरोधकांची मते फुटल्याने त्यांचे फावले आहे. या वेळी असे होऊ नये असा आमचा प्रयत्न असल्याने सर्व विरोधक एका मंचावर यावेत असे आम्हाला वाटते. मात्र, मनसेबाबत निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी भागात दौरा
दुष्काळी परिस्थितीशी लढण्यास सरकार अपयशी ठरलेले आहे. भ्रष्ट, अकार्यक्षम आणि असभ्य सरकारविरुद्ध आम्ही कडवा संघर्ष करू. मी स्वत: दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे. दुष्काळ निवारण कामातील पक्षपात व भ्रष्टाचार रोखण्यासाठी देखरेख समित्या स्थापन केल्या जातील. या समित्या दुष्काळ निवारण कामावर लक्ष ठेवतील.

मे महिन्यात अधिवेशन
मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलणार ? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येईल. मे महिन्यात मुंबईत एक अधिवेशन घेतले जाणार असून त्यात कार्यकारिणीची घोषणा करू व पक्षाची पुढील रणनीती तयार केली.