आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसचे पाच \'गोंधळी\' आमदार दोन वर्षांसाठी निलंबित, राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केलाच्या आरोपावरून कॉंग्रेसच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाचही आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. राहुल बोंद्रे (चिखली), अब्दुल सत्तार अब्दुल नबी (सिल्लोड), वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) या निलंबनाची कारवाई झालेल्या आमदारांची नावे आहेत.

राज्यपाल सी विद्यासागर राव आपल्या अभिभाषणाला विधिमंडळात प्रवेश करत असताना कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्तारुढ भाजपने केला होता. व्हिडिओ क्लिपमध्ये कॉग्रेसचे 'ते' बारा आमदार दिसत असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. तसेच कॉंग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्‍याची मागणी खडसे यांनी केली होती.
दुसरीकडे, भाजप आणि कॉंग्रेस आमदारांमध्ये चांगलीच जुंपली होती. अध्यक्षांच्या दालनासमोरच कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन हे दोघे आपापसात भिडले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

राज्यपालांची गाडी रोखल्याबद्दलचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला. संबंधित प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी विरोधीपक्षनेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली. मात्र, नंतर सत्तारुढ आमदारांनीही सभागृहात प्रचंड गदारोळ केला आहे. कॉंग्रेसच्या 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी एकनाथ खडसे यांनी लावून धरली होती.

एवढेच नाही तर कॉंग्रेस आमदारांकडून असा प्रकार झाला असेल तर कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

कॉंग्रेसचे निलंबित आमदार अब्दुल सत्तार हे प्रति‍क्रिया देताना म्हणाले, कॉंग्रेसच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे वेळ मागितला होता.लोकशाही पद्धतीने मतदान करण्याची मागणी राज्यपालांना केली होती. मात्र, कॉंग्रेसच्या आमदारांना राजपालांनी वेळ दिला नाही. भाजपला सत्तेची गुर्मी आली असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

कॉंग्रेस आमदारांवर निलंबनाची कारवाई करताना भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. राज्यपाल विधिमंडळात आले तेव्हा ‍भाजपचे आमदार तिथे काय करत होते. भाजपचे आमदार राज्यपालांचे बॉडीगार्ड होते काय? असा सवालही अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.