आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयातील आग : मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा व न्यायालयीन चौकशी करा- भाजप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयाच्या आगीबाबत संशय व्यक्त करत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी विधानसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आगीभोवतीचा संशय हा विरोधकांनी निर्माण केला असून किमान अशा वेळी तरी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवावा, असा सल्ला खडसेंना दिला.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुढे ढकलण्यात आलेल्या आगीबाबतच्या चर्चेस मंगळवारी सुरुवात झाली. खडसे म्हणाले की, ही आग हेतुपुरस्सर लावल्याचा लोकांच्या मनात संशय आहे. अग्निविरोधक यंत्रणा काम करत नव्हती. या प्रकरणी अद्याप एफआयआरही दाखल झालेला नाही, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल न करता तपास गुन्हे शाखेकडे दिल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नि:पक्षपाती तपास करतील का, अशी शंका त्यांनी बोलून दाखवली. तसेच बांधकाम मंत्री छगन भुजबळ की सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर करावा, असेही त्यांनी सरकारला सुनावले.
आगीमागे दोन्ही कॉँग्रेसची भांडणे- 'मिस्टर क्लीन' मुख्यमंत्र्यांना राज्यातील भ्रष्टाचार साफ करण्यासाठी आणले होते. पण भ्रष्टाचाराच्या सर्व फाइल्स आगीमध्ये भस्मसात झाल्याने त्यांच्याकडे आता कुरबुर करायला वावच उरला नाही, असा टोमणा खडसे यांनी लगावला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांच्या आपापसातील भांडणांमुळे मंत्रालयाला आग तर लावण्यात आली नाही ना, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. काही काळापूर्वी मंत्रालयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव राज्य सरकारने बनवला होता. पण त्यामध्ये मंत्रालयाचा विकास झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नियमांप्रमाणे दाखवल्याने आपण त्याला आक्षेप घेतला. मग तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ती चूक मान्य करून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. आपसातील भानगडींमध्ये मलिदा खाण्यासाठी तर अशी घटना घडलेली नाही ना, असा सवालही त्यांनी विचारला. मंत्रालयाच्या पुनर्विकासाबाबत शरद पवार यांनी ते बीओटी किंवा खासगी विकासकाला देण्यास विरोध केला होता. त्याची आठवण करून दिली.
जितेंद्र आव्हाडांचा पलटवार- राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी मात्र खडसे यांना चोख उत्तर देत जाळपोळ करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची संस्कृती नसल्याचे सांगितले. उलट सत्ता मिळत नसल्याने सैरभैर झालेल्या विरोधकांनी असे पर्याय शोधून काढले का, असा उलटा सवाल त्यांना केला. या आगीत नागपूर बलात्कार प्रकरण, जळगावमधील भ्रष्टाचार, बोरोले अटक याही फाइल्स जळाल्या असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवले. आगीत पाच जणांचा बळी गेला व तिरंग्याला वाचवण्यासाठी काही कर्मचार्‍यांनी जिवाचीही पर्वा केली नाही, त्यांच साधा उल्लेखही खडसेंनी न केल्याबद्दल आव्हाडांनी आश्चर्य व्यक्त केले. उलट सर्व साडेसहा हजार कर्मचारी सुखरूप बाहेर पडले त्याबद्दल सुटकेचा नि:श्वास टाकण्याऐवजी विरोधकांच्या मनात आगीविषयी शंका कशी उपस्थित होऊ शकते, असे ते म्हणाले.
अध्यक्षांवर कागद भिरकावले- भाजपचे सुधीर मुनगंटीवार बोलत असताना तालिका सभापती नवाब मलिक यांनी वेळ संप्याची बेल वाजवली. त्यामुळे 'सभापती बोलू देत नाहीत', असे सांगत मुनगंटीवार सभागृहाच्या बाहेर पडले. मात्र मलिक म्हणाले की, 'मी थांबवले नव्हते पण वेळ संपल्याची सूचना केली व तेच निघून गेले'. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ सुरू केला. भाजपच्या आमदारांनी कागद फाडून अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले. त्यामुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आगीच्या प्रकरणी 304 अंतर्गत गुन्हा दाखल करावा; अन्यथा आम्ही दंडाधिकारी चौकशीची मागणी करू, असे सांगितले.
विश्वास कोण ठेवणार?- मंत्रालयामध्ये नगरविकास विभागाच्या लवासा, रामोशी वतन जमीन, मुंबई शहर व उपनगरांतील सनदी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना दिलेल्या जागा आदी फाइल्स जळाल्याचे खडसे म्हणाले. त्यामुळे शेकडो प्रकरणे जळून खाक झाली तरी सरकार शॉर्टसर्किटने आग लागल्याचे का सांगते आणि त्यावर विश्वास कोण ठेवणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंत्रालयातील आग : घात नव्हे अपघातच, ज्वलनशील पदार्थ नसल्याचा निष्कर्ष
मंत्रालयातील आग, जनता आणि राजकारणी