मुंबई- ‘‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मर्हाट्याविना राष्ट्रगाडा न चाले’’ असे सेनापती बापटांनी सांगून ठेवले आहे. युती, आघाडीच्या राजकारणात महाराष्ट्राच्या भवितव्याचे गणित बिघडू नये. महाराष्ट्र कोसळला तर इतिहास माफ करणार नाही. युती व महायुती राहावी असे आमच्यासह मित्रपक्षांना व महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच आहेत. 105 मराठी हुतात्म्यांच्या बलिदानावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार आहे, अशी टीका शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर सोडली आहे.
गेली पंचवीस वर्षापासून राज्यात घट्ट असलेली शिवसेना-भाजपची युती अखेर गुरुवारी संपुष्टात आली. याबाबत शिवसेनेनी
आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, गेली पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या विचारांनी घट्ट बांधली गेलेली शिवसेना-भाजपची युती दुर्दैवाने संपुष्टात आली. शिवसेना-भाजप आणि घटकपक्षांची महायुती अखंड राहावी यासाठी आम्हीही शेवटपर्यंत प्रामाणिकपणे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने युती कायम राहू शकली नाही. आता पुढे काय घडेल, काय बिघडेल ते दिसेलच. सर्व काही सांभाळण्यास आई तुळजाभवानी समर्थ आहे. ती जसे ठरवील तसेच होईल. काही झाले तरी शिवसेना आणि भगवा झेंडाच महाराष्ट्राचे रक्षण करणार आहे. ती नियतीनेच शिवसेनेवर सोपविलेली जबाबदारी आहे. शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद, आई तुळजाभवानीची कृपा, आमच्या हजारो-लाखो शिवसैनिकांचे ‘शिवबंधन’ आणि राज्याच्या 11 कोटी जनतेचे पाठबळ यामुळे शिवसेना ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडील याची खात्री आम्ही आजच देत आहोत, अशी भूमिका सेनेने मांडली आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, आज प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यातील गटा-तटाचा, जातीचा, पोटजातीचा ‘सेनापती’ उदयास आला आहे व असे असंख्य सेनापती विधानसभा रणधुमाळीत उतरून एकमेकांवर तलवारी चालवीत आहेत. काल जे या तंबूत आरती करीत होते ते क्षणात दुसर्या तंबूत जाऊन ‘नमाज’ पढतात. तेव्हा विचार, निष्ठा या शब्दांना तसे काही मोलच उरलेले नाही. खरे तर पितृपक्ष संपला. सगळ्यांचीच पितरं खाली येऊन गोडधोड, तिखट खाऊन संतुष्ट होऊन गेली, पण पितरांचे राजकीय वारसदार मात्र जागावाटपाचे पिंडदान करायला तयार नव्हते. अखेर पितृपक्षाचे कावळे उडाले व शूर मावळे राहिले याचे प्रत्यंतर लवकरच महाराष्ट्राला येईल, असे सेनेनी म्हटले आहे.