आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ठाणे’दाराच्या स्पर्धेत भाजपचाही उमेदवार, शिवसेनेकडे बहुमत असूनही भाजपने ठाेकला शड्डू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - ठाणे महापालिकेत शिवसेनेचे बहुमत असल्याने त्या बळावर शिवसेनेचा महापौर बिनविरोध निवडून येणार अशी परिस्थिती असताना भाजप आणि राष्ट्रवादीनेही आपापले उमेदवार महापौरपदासाठी  उतरवल्याने या महापालिकेत चुरस निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या तीन दिग्गज नेत्यांच्या पत्नी निवडून आलेल्या असतानाही महापौरपद मात्र एका सर्वसामान्य कार्यकर्त्या महिलेला देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. 
 
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या सहा मार्च होणार असून त्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. ठाण्याचे महापौरपद शिवसेनेच्या निष्ठावंताकडे जाणार की घराणेशाहीकडे यावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला अाहे. पक्षश्रेष्ठींनी घोडबंदर येथील नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे या सलग तीन वेळा महापालिकेवर निवडून आल्या असून त्यांनी यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष आणि स्थायी समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी पार पाडली आहे. 
 
विशेष म्हणजे महापौरपदाच्या शर्यतीत त्यांच्यासमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक, खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या तिघींचे आव्हान होते. मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना उमेदवारी दिल्याने पक्षात निष्ठवंतांची कदर केली गेली, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून अर्ज भरताना व्यक्त केली जात होती. दिवा भागाला प्रथमच न्याय देताना उपमहापौरपदासाठी शिवसेनेतर्फे रमाकांत मढवी यांनी अर्ज भरला आहे.   
 
शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचाच महापौर विराजमान होणार हे अटळ असतानाही भाजपने आशादेवी सिंग आणि मुकेश मोकाशी यांची अनुक्रमे महापाैर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी जाहीर करत अर्जही दाखल केले. ‘आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सत्ता काबीज करू,’ असा दावा आता भाजपने केला आहे. राष्ट्रवादीनेदेखील ऐनवेळी महापौरपदासाठी अश्रीन राऊत आणि उपमहापौरपदासाठी आरती गायकवाड यांचे अर्ज दाखल केले आहेत. फक्त तीन नगरसेवक निवडून आले असतानाही काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे.    

महापाैर अामचाच, विकासासाठी कटिबद्ध : एकनाथ शिंदे
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते  आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ठाणेकरांनी कौल दिला असल्याने आमच्याजवळ स्पष्ट बहुमत अाहे. त्याआधारे आमचाच महापौर बसणार हे निश्चित असून ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही आणखी काही महत्त्वाची पावले उचलणार आहोत.’ ‘आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असून त्याच मुद्द्यावर आमचा महापौरदेखील होईल,’ असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी व्यक्त केला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीही आपले संख्याबळ जरी कमी असले तरीही आम्ही महापौरपदाच्या निवडणुकीत चांगला लढा देऊ, असे मत व्यक्त केले आहे.   
बातम्या आणखी आहेत...