आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Changes Programme On Time To Won The Motion Of Confidence

भाजपच्या खेळीने शिवसेनेची गोची!, आधी पाठिंबा द्या, मग सत्तेत घेतो म्हणत पुन्हा मधाचे बोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने बुधवारी विधानसभेत विश्वास प्रस्ताव जिंकल्याचे वृत्त कळताच फडणवीस यांच्या नागपूर मतदारसंघात महिला व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याने निश्चिंत असलेल्या भाजप सरकारने विशेष अधिवेशनात बुधवारी विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेनेची चांगली अडचण करत विश्वास प्रस्ताव मंजूर करून घेतला. खरे तर दिवसाच्या कार्यक्रमानुसार अध्यक्षांची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षाची निवड होणार होती, पण ते न करता पटलावरील तिस-या क्रमांकावर असलेला विश्वासदर्शक ठराव बहुमताला आणून सत्ताधा-यांनी शिवसेनेसह काँग्रेसचाही गोंधळ उडवला. राष्ट्रवादी तटस्थ असताना ठराव कसा मंजूर झाला, हे काही क्षण शिवसेना व काँग्रेसला कळलेच नाही.
जुळलं तर जुळलं... असे आदल्या दिवसांपर्यंत सांगत सत्तेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेनेला भाजपने विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत अक्षरक्ष: खेळवले. बुधवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते व रामदास कदम यांनी सकाळी साडे नऊच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्तेतील सहभागािवषयी चर्चा केली. मात्र आधी विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा द्या, मगच याविषयी बोलता येईल, हीच भूमिका फडणवीसांनी कायम ठेवली, त्यामुळे शिवसेनेला धक्काच बसला. आधीच्या मागण्या कमी करून सत्तेत जाण्याची तयारी दाखवूनही आजचा दिवस जाऊ दे, नंतर बघू अशी एकेकाळच्या मित्रपक्षाची वागणूक पाहून शिवसेना नेत्यांनीही आधी सत्तेचे बाेला, असा हेका कायम ठेवला. मात्र ते शक्य नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केल्याने शेवटी शिवसेना नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
लबाड कोल्ह्याचे आवतण
सत्तेततील सहभागाविषयी भाजपने शेवटपर्यंत शिवसेनेशी केलेली चर्चा म्हणजे लबाड कोल्ह्याचे बगळ्याला दिलेले आवतण होते. पसरट थाळीत बगळा काही खाऊ शकणार नाही, हे कोल्ह्याला माहित असल्याने त्याने अशाच थाळीत जेवण ठेवले. बगळयाची फार निराशा झाली. पण, बगळा ही फिटमफाट करण्याच्या तयारीत होता. त्यानेही कोल्ह्याला जेवण देताना मोठ्या सुरईत जेवण दिले. शेवटी कोल्हाही जेवण करू शकला नव्हता, हे सुद्धा लक्षात ठेवायला हवे, अशी कथा सांगत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो-हे यांनी दिवसभरातील घडामाेडींवर सांकेतिक प्रतिक्रिया दिली.
लोकशाहीचा गळा घोटला
अल्पमतातील या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी आम्ही रीतसर मतदानाची मागणी करत होतो. पण, आवाजी मतदान घेत सदनाची दिशाभूल केली. भाजपमध्ये हिंमत होती तर त्यांनी आपल्या बाजूने किती सदस्य आहे हे तपासून घ्यायचे होते. पण आपण बहुमताच्या दिशेने जात नाही, हे लक्षात घेऊन राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेत सरकार तरून नेले. मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्यपालांकडून हे सरकार बरखास्त करण्याची मागणी तर करूच, पण न्यायालयाचेही दरवाजे आमच्यासाठी खुले असतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दिली.
सर्व काही नियमाप्रमाणेच
विश्वासदर्शक ठराव हा नियमाप्रमाणेच झाला. अध्यक्ष म्हणून मी सत्ताधा-यांसह विरोधी पक्षांनाही संधी दिली होती. अनुकूल सदस्यांची संख्या जास्त असल्याने मी ठराव मंजूर केला.
हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष