आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व पर्याय खुले, पण महापाैर भाजपचाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कल्याण- डोंबिवलीत कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला अाहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर ‘आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असून महापौर भाजपचा असेल’, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मंगळवारी स्पष्ट केले.

कल्याणमध्ये महापौर भाजपचा असावा, अशी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. यामुळेच आम्ही सर्व पर्याय चाचपून पाहत आहोत. नैसर्गिक नियमानुसार अामचा महापौर झालेला पाहायला मिळेल. नैसर्गिक नियमानुसार चर्चेचे पर्याय चारी बाजूंनी खुले असतात. यात शिवसेनेसह मनसे, अपक्षांबरोबरही चर्चा हाेऊ शकते, असे दानवेंनी स्पष्ट केले.

भाजपचे ४२ नगरसेवक निवडून आले असून आमला संघर्ष समितीच्या ९ जणांची साथ असल्याने हा आकडा ५१ वर जातो. बहुमतासाठी ६१ चा आकडा गाठायचा असल्याने ११ अपक्ष तसेच मनसेच्या ९ नगरसेवकांचा विचार होऊ शकतो. नैसर्गिक नियमानुसार आम्ही सत्तेच्या जवळ जाऊ शकतो, असा मार्ग दानवेंनी सांगितला.

कोल्हापूरातही सत्तेसाठी प्रयत्न करणार!
संख्येचा विचार करता कोल्हापुरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत कोल्हापुरात तुम्ही कशी काय सत्ता स्थापन करणार? यावर दानवे म्हणाले, आमचे १२, ताराराणीचे २०, शिवसेनेचे ४ अाणि इतर जुळवाजुळव झाली तर आमचा महापौर निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. बहुमतासाठी ४१ नगरसेवकांची गरज असून तो आकडा आम्ही गाठू शकतो. सध्या सहकारमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असून ते सत्ता आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत, असे दानवे म्हणाले.
अामचा पक्ष बापच !
कल्याण तसेच कोल्हापूर महापािलकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे. शिवाय ५९ नगरपंचायतींच्या १ हजार ०९ जागांवर भाजपचे २५४ लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. काँग्रेस २३३ सह दुसऱ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १९६ जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेला १२३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे राज्यभरात भाजप सर्वात मोठा पक्ष बनला असून ग्रामपंचायतींचे निकालही भाजपच्या बाजूने लागले आहेत. नैसर्गिक मित्रांसाठी तर भाजप भाऊ नाही तर बाप झाला असून शक्य असेल तेथे आम्ही सत्ता स्थापन करणार आहाेत, असा टोलाही दानवेंनी मारला.