आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे भाजपचे लक्ष्य, आगामी निवडणुकांची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे भाजपने लक्ष्य ठेवले आहे.  यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-गोवा कोस्टल रोड, पुणे-सातारा महामार्ग, समृद्धी महामार्ग, पंढरपूरचे पालखी महामार्ग यांचा समावेश अाहे.या सर्व कामांचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी आढावा घेतला. दोन वर्षांत निवडणुकांपूर्वी हे सर्व महामार्ग पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.  

एमएसआरडीसीच्या कार्यालयात गडकरी यांनी या प्रमुख महामार्गांच्या कामाचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासून तयारीला सुरुवात केली असून राज्यातील प्रमुख महामार्गांचे काम २०१९ च्या सुरुवातीला पूर्ण करून ते लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असून त्यासाठी गडकरी यांनी तातडीने बैठक घेऊन प्रकल्पांची कामे कुठवर आली आहेत याबाबत माहिती घेतली.   
 
गडकरी हे वेगवान कामासाठी प्रसिद्ध असून युतीच्या काळातही सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांनी राज्यात कामांचा धडाका लावला होता. आता केंद्रात रस्ते वाहतूकमंत्री झाल्यापासून ते राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दर तीन महिन्यांनी ते राज्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतात. फक्त महाराष्ट्र नव्हे, तर इतर राज्यांमध्येही गडकरींनी वेगवान कामे केली असून मोदी सरकारमधील ते सर्वात कार्यक्षम मंत्री समजले जातात.  

 गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गाेवा महामार्गाचे सध्या जोरात काम सुरू असून ते जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल. या महामार्गावरील पनवेल-इंदापूर टप्पा मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. या टप्प्यामुळेच गेले बरीच वर्षे या महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. त्याचबरोबर मुंबई-गोवा कोस्टल रोडचा डीपीआर पूर्ण झाला असून ३१ मेपर्यंत निविदा काढण्यात येणार आहे. तसेच पंढरपूरला देहू आणि आळंदीवरून जाणारे दोन्ही पालखी महामार्ग जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. पुणे-सातारा रस्त्याचे काम ८२ टक्के कामे पूर्ण झाले असून उरलेले काम काही महिन्यांतच पूर्ण होईल. त्याचबरोबर खंबाटकी घाट टाळण्यासाठी साताऱ्याला जाण्याच्या मार्गावर आणखी एक बोगदा बांधला जात आहे. तसेच रायगड किल्ला विकासासाठी ६५० कोटी खर्च केले जाणार असून त्यापैकी २६० काेटी हे महाड ते रायगड रस्त्यासाठी वापरले जातील.
 
सावित्री नदीवरील पूल जूनपासून वाहतुकीस हाेणार खुला
सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल गेल्यावर्षी २ आॅगस्टला वाहून गेला होता. यात ४५ जणांना प्राण गमावावे लागले होते. या पुलाची पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी हा पूल ६ महिन्यांच्या आत नव्याने बांधण्यात येईल, अशी घोषणा केली होती. सहा महिन्यांत हा पूल पूर्ण झाला नसला तरी नवीन पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून ५ जूनला वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. नितीन गडकरी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद््घाटन करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.    

मुंबईतही विकासकामे
मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टीही विकसित करण्याचा प्रस्ताव असून मुंबई पोर्ट ट्रस्टमधील साडेसातशे हेक्टर जागेच्या विकासाचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे येथे सध्याच्या मरीन ड्राइव्हपेक्षा तिप्पट मोठा मरीन ड्राइव्ह येथे बांधला जाईल. तसेच दुबईतील बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत बांधण्याचाही प्रस्ताव आहे. याचबरोबर कन्व्हेन्शन सेंटर, हाॅटेल्स, मुंबई पोर्ट ट्रस्टची कार्यालये या परिसरात असतील. यासाठी १०० टक्के खर्च हा केंद्र सरकार करणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...