आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्गत दुफळीने भाजप आमदार हैराण; खडसेंच्या मदतीला अखेर राष्ट्रवादी धावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सध्या विरोधी पक्षांतच, विशेषत: भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळल्याचे दिसत आहे, त्याचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित असतानाही त्यांचीच तोंडे दोन दिशेला असल्याचे चित्र आहे. भाजपचे इतर आमदार मात्र या गटबाजीला कंटाळले आहेत.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज ठाकरे यांनी खडसे यांच्यावर सेटलमेंटचा आरोप केले. त्यावर भाजपने एकजुटीने विरोध केला नाही. विधानभवनातही या प्रकरणाचे पडसाद उमटले. अशावेळी खडसेंना साथ देण्यासाठी भाजपमधून कोणीच पुढे आले नाहीत. उलट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी मनसेविरोधात हक्कभंग दाखल करावा, अशी मागणी केली. सत्ताधारी मदतीला धावून आले तरी भाजपच्या कोणत्याच नेत्याने खडसेंना साथ दिली नाही. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी तर थेट राज ठाकरे यांची घरी जाऊन भेट घेतली. हे अनेक भाजप आमदार, पदाधिकार्‍यांना पटले नाही, तसे त्यांनी खासगी बोलूनही दाखवले.

मोदींची स्तुती, खडसेंवर टीका : नेमके वादाच्या वेळीच गडकरींना राज यांना भेटण्याची गरज नव्हती. उभयतांचे संबंध कितीही चांगले असले तरी राज यांनी आरोप केले तेव्हा गडकरी का बोलले नाहीत, असा सवाल भाजपच्या एका आमदाराने केला. राज ठाकरे नेहमीच नरेंद्र मोदी यांची स्तुती करतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचे नेते खडसे यांच्यावर मात्र आरोप करतात, याबद्दलही आणखी एका आमदाराने आश्चर्य व्यक्त केले.

महाधिवक्त्यांच्या मुद्दय़ावरूनही दुफळी- सिंचनाच्या निधी वाटपावरून महाधिवक्त्यांनी दिलेल्या शपथपत्रात राज्यपालांचे आदेश बंधनकारक नसल्याचे म्हटले होते. हा मुद्दा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला आणि महाधिवक्त्यांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी करत कामकाज बंद पाडले. तोच मुद्दा विधान परिषदेतही उपस्थित करण्यात आला, पण अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर तावडेंनी विरोधाची तलवार म्यान केली. त्याच दिवशी भाजपचे विधानसभा सदस्य राज्यपालांना भेटायला गेले, तेव्हा गडकरी गटाचे आमदार, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र जाणे टाळले.

मनसेशी विरोध मावळला, अंतर्गत गटबाजी सुरूच- महाधिवक्त्यांच्या वादग्रस्त शपथपत्रावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीतही भाजपचा विधान परिषदेतील एकही आमदार गेला नाही. त्याच वेळी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे मात्र खडसे यांच्यासोबत राहिले. या दोन्ही आमदारांनी नंतर खडसे यांची भेट घेऊन भाजप आणि मनसेमधील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते, पण भाजपमधील अंतर्गत संघर्ष मात्र मिटण्याची चिन्हे नाहीत. विधिमंडळात असो की बाहेर मुंडे विरुद्ध गडकरी गटाचा संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरूनही दोन्ही गटांत रस्सीखेच असून मुनगंटीवार यांनाच कायम ठेवले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.