आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp District President Pratap Dhakane May Joins Ncp In Tomarrow

प्रदेश भाजपात बंडाळी: नगरचे ढाकणे राष्ट्रवादीत, लातूरात भालेरावांचे बंड?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशात मोदी लाट असल्याचा व त्या जोरावर राज्यात 35 जागा जिंकण्याचा दावा करणा-या भारतीय जनता पक्षाला स्वपक्षायानीच धक्का दिला आहे. अहमदनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तर, लातूरमधून सुनील गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने गडकरी-तावडे गटाचे आमदार सुधीर भालेराव बंड करण्याच्या तयारीत आहेत. उदगीरचे आमदार असलेल्या भालेराव यांनी आपल्याला उमेदवारी नाकारल्याचे स्पष्ट होताच उमेदवारीचा अर्ज आणला. तसेच आपण फॉर्म भरणार असून, पक्ष बी-फॉर्म देपर्यंत लढाई लढणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ढाकणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने नगरची जागा राखण्यास भाजपला मोठी मेहनत करावी लागणार आहे.
प्रदेश भाजपने विद्ममान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापण्यास निवडणूक समितीला सांगितले होते. तसेच प्रदेश भाजपनेही नगरमधून प्रताप ढाकणे यांचे नाव पुढे केले होते. मात्र, दिलीप गांधी यांनी थेट दिल्लीत सेटिंग करून राज्यातील नेत्यांनाही बायपास करीत उमेदवारी मिळवली. त्यामुळे गांधी यांच्याबाबत राज्यस्तरीय भाजप नेता काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र ढाकणे यांनी मोदींचे नाव न घेता विद्यमान खासदारांवर टीका केली. देश भ्रष्टाचारमुक्त करू असे सांगणारा भाजप अर्बन बॅंकेत भ्रष्टाचार करणा-याला तिकीट कसे काय देतो अशी टीका नाव न घेता मोदी-राजनाथ जोडीवर केली होती. त्यानंतर प्रताप ढाकणे यांनी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला व गांधी यांच्या प्रचारापासून दूर राहणे पसंत केले. याच दरम्यान नगरचा खासदार यंदा राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे असे ठाण पवारांनी मांडले. राजीव राजळे यांना तिकीट दिल्याने नगरमधील दोन्ही काँग्रेस एकत्र प्रचार करताना दिसत आहेत. राजीव राजळे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे काँग्रेसही तेथे राजळेंच्या प्रचारात उतरल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत भाजपच्या अडचणी वाढल्या असतानाच व ही जागा टिकवण्याचे आव्हान असताना पक्षाने गांधी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या ढाकणे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील.