आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची मुंबईत गांधीगिरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मुंबईतील 22 विधानसभा मतदारसंघातील काही प्रातिनिधिक खड्डे या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजवून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची नियुक्ती झाली. मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर शेलार यांनी मुंबई पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली आणि मुंबईच्या 20 प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत निवेदन दिले होते. पावसाळा आणखी तीन महिने बाकी आहे. इतक्यातच मुंबईतील रस्त्यांची अक्षरश : चाळण झाली आहे. स्थायी समितीने खड्डे बुजवण्यासाठी निधी मंजूर केला. मात्र, पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे खड्डे बुजवले जात नाहीत, असा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील 22 विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी खड्डे बुजवण्याचे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यांची आता तरी पालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा भाजप कार्यकर्ते अधिकार्‍यांना घेराव घालतील असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

शिवसेनेला घरचा आहेर
भाजप कार्यकर्ते ज्या पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत त्या मुंबई पालिकेत गेली 18 वर्षे सेना-भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाने पालिका अधिकार्‍यांचे कान टोचले नसून शिवसेनेला मात्र घरचा आहेर मिळाल्याची चर्चा आहे.