आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Gives Maharashtra Rajya Sabha Seat To RPI Leader Ramdas Athawale

‘एनडीए’च्या घटक पक्षात रिपाइंचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची राज्यसभा खासदार होण्याची मनीषा अखेर पूर्ण झाली. भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातून त्यांना उमेदवारी देण्याचा अधिकृत निर्णय सोमवारी घेतला. मंगळवारी दुपारी 12 वाजता आठवले उमेदवारी अर्ज भरतील.

रामदास आठवले यांना राज्यसभेची उमदेवारी देतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ‘एनडीए’चा घटक पक्षाचा दर्जा देण्यात आला. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप प्रदेश कार्यालयात या निर्णयाची घोषणा केल्यानंतर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. जावडेकर यांच्या जागी आठवलेंची वर्णी लागणार असल्याने भाजपचे काही निष्ठावंत मात्र नाराज झाले आहेत.

महायुतीच्या नेत्यांची शनिवारी झालेल्या बैठकीत आठवलेंना भाजपकडून राज्यसभेची जागा देण्याचे ठरवण्यात आले होते. त्याच वेळी शिवसेनेने आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकसभेसाठी रिपाइंला कोणतीही जागा न देण्याचेही भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केले. दिल्लीत पक्षश्रेष्ठींमकडून राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या निर्णयाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आठवलेंचा मार्ग सुकर झाला. दरम्यान, एप्रिलमध्ये खासदारकीची मुदत संपत असलेल्या प्रकाश जावडेकर यांचा मात्र त्यामुळे पत्ता साफ झाल्याची चर्चा आहे.

जावडेकरांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील : मुंडे
राजकीय सोय बघताना मुंडे यांनी जावडेकरांचा पत्ता कट करून पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकार्‍याला दूर केले, अशी दबकी चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. जावडेकरांना राज्यसभेची जागा आता कुठल्या राज्यामधून कुठून मिळणार, असे विचारले असता मुंडे म्हणाले, तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळे बाबासाहेबांना न्याय : आठवले
राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने आनंदित झालेल्या आठवलेंनी भाजप नेत्यांचे आभार मानले. त्या वेळी इतिहासातील काही संदर्भ देत ते म्हणाले, 1952 मध्ये मुंबईत, तर 54 साली भंडारा निवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केले होते. मात्र जनसंघाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळेच आंबेडकरांना न्याय मिळाला. ते राज्यसभेवर निवडून आले आणि त्यांनी घटना तयार करण्याचे महान काम केले. भाजपने दलित व सवर्णांना एकत्रित करण्याचे मोठे काम केले आहे.