आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज पुरोहितांचे \'तो मी नव्हेच\'! तीन दिवसात लेखी उत्तर दया- भाजपची नोटिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे मुंबईतील आमदार राज पुरोहित यांना भारतीय जनता पक्षाने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. आपण पक्षाच्या शिस्तेचा भंग केला असून, वृत्तवाहिन्यांत प्रसिद्ध झालेल्या स्टिंग ऑपरेशनबाबत आपले म्हणणे काय आहे त्याबाबत तीन दिवसात लेखी स्पष्टीकरण द्यावे असे या कारणे दाखवा नोटिशीत म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही नोटिस बजावली आहे. दरम्यान, पुरोहित यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, 'तो मी नव्हेच' अशी भूमिका घेतली आहे. 'स्टिंग ऑपरेशन'च्या व्हिडिओमधील तो आवाज माझा नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.
भाजपचे कुलाबा मतदारसंघाचे आमदार आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचा शुक्रवारी एक स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आला होता. यात पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात मुक्ताफळे उधळली आहेत.
पुरोहित यांचा खुलासा-
एक पत्रक काढून राज पुरोहित यांनी आपला खुलासा केला आहे. स्टिंग ऑपरेशन म्हणजे माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे. त्यात तथ्य नाही. जी सीडी दाखवली जातेय, त्यातला आवाज माझा नाही. माझ्या स्वच्छ प्रतिमेला आणि नेतृत्वाला यामुळे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी माझ्या पक्षाच्या नेतृत्वाचा मनापासून आदर आणि सन्मान करतो. त्यांच्याबद्दल मी कधीच कुठलेही भाष्य करू शकत नाही. आरएसएस माझे पालक आहेत त्यांच्यावर तर मी स्वप्नातही टीका करू शकत नाही.
देवेंद्र फडणवीस एक आदर्श मुख्यमंत्री आहे. रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे आदर्श नेते आहेत. त्यांच्याविरूद्ध मी कसलेही विधान करण्याचे कारण नाही. ही सीडी बोगस आणि काल्पनिक आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केलेली आहे. तथाकथित सीडीबाबत फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन करण्याची मागणी केली आहे, असे पुरोहित यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राज पुरोहित यांनी काय-काय म्हटले आहे या तथाकथित स्टिंग ऑपरेशनमध्ये...
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे, मात्र त्यांच्या काही धोरणांमुळे व्यापारी वर्ग दुखावला गेला आहे.

- भाजपात आता सामूहिक नेतृत्व उरलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष
अमित शहा ही देशातील दोन सत्ता केंद्रे बनली आहेत. असल्या लोकशाहीला काहीच अर्थ नाही.
- आजकाल पक्षात पैसा असणा-यांचीच चलती आहे. संघ पण त्याच दिशेने चालला आहे. पैसा ओतला असता तर मलाही मंत्रिपद मिळालं असते पण तसे होऊ शकले नाही.
- माझ्यावर अन्याय झाला आहे. मला मंत्रिमंडळात घेतले असते तर मी खडसेनंतर सर्वात वरिष्ठ मंत्री ठरलो असतो.
- गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सर्व राजकारण बदललं आहे. मुंडे आज असते मी किंगमेकर असतो.
- मुंडे असते तर देवेंद्र फडणवीस कुठे व कोण असते?, मुख्यमंत्र्यांवर बिल्डर लॉबी नाराज आहे.
- भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी प्रमोद महाजन यांचा सर्व पैसा लाटला त्यातून ते
गब्बर झाले आहेत. तोच पैसा त्यांनी बिल्डर्स लॉबीत गुंतवला आहे.
- गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मंगलप्रभात लोढा यांनी पैसा ओतला आहे.
- राज ठाकरे बोगस नेता आहे. तो मेहनती व कर्तृत्ववान अजिबात नाही. तो एक दिवस गल्लीतील नेता होईल. जातीयवादी व समाजात दुही पसरवण्याचे काम राज यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...