आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Gives To Shivsena Of Power Share 30 Percentage Sources

फडणवीस मंत्रिमंडळ छोटेखानीच: शिवसेनेला 8 मंत्रिपदे तर घटकपक्षांना एक-एक मंत्रिपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा, ओम माथूर आणि नव्या मंत्र्यांची सह्याद्रीवर मध्यरात्रीपर्यंत बैठक सुरु होती.)
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आकार छोटाच राहणार असून, आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात 10 टक्के आमदारांचेच मंत्रिमंडळ असणार आहे. याचबरोबर आपले सरकार स्थिर व भक्कम राहावे यासाठी फडणवीस शिवसेनेसोबतच व घटकमित्रपक्षांना सोबत घेणार आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची संख्या 30-32 च्या आसपास असणार आहे. यात भाजपकडे 18, शिवसेनेकडे 8 तर चार घटकपक्षांना 2 कॅबिनेट व 3 राज्यमंत्रीपद अशी एकून 5 मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संख्या 288 आहे त्यानुसार 10 टक्के मंत्रिपदाचे मंत्रिमंडळ बनवायचे झाल्यास 29 जणांचा समावेश होऊ शकतो. त्यानुसारच भाजप पावले टाकत असून आपल्या सरकारची मंत्रिपदाची संख्या 30-32 च्या वर जाणार नाही याची काळजी घेताना दिसणार आहे.
फडणवीस सरकारचा शुक्रवारी मुंबईत दिमाखदार व नेत्रदीपक सोहळ्यात शपथविधी पार पडला. त्यानंतर काल रात्री मुख्यमंत्री फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, ओम माथूर यांची मध्यरात्रीपर्यंत मंत्रिमंडळ व शिवसेनेच्या सहभागाबाबत खल सुरु होता. त्यात शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत वाटा देण्याबरोबर मित्रपक्षांना न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस व शहा-माथूर यांच्यात विस्तृत चर्चा झाली. त्यात फडणवीस यांनी आपल्या सरकारला चांगली कामगिरी करण्याची फार मोठी संधी आहे. त्यासाठी स्थिर व भक्कम असणे गरजेचे असल्याचे शहांच्या निदर्शनास आणून दिले. शिवसेना हा नैसर्गिक मित्र असून आपली व त्यांची विचारधारा जुळती मिळती आहे. त्यांना दूर करण्यापेक्षा जवळ ठेवण्यातच आपले हित आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत सावध भूमिका मांडताना पवार कधीही आपल्याला धोबीपछाड देऊ शकतात. मात्र, शिवसेना एकदा सोबत आल्यास धोकाबाजी करणार नाही त्यामुळे शिवसेना व मित्रपक्षांना सोबत घेतल्यास स्थिर सरकार राहील व जनतेच्या अपेक्षांनाही खरे उतरण्यास मदत होईल अशी बाजू फडणवीस यांनी शहा यांच्याकडे मांडली.
भविष्यातील राजकीय सोय म्हणूनही राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना उपयुक्त आहे ही बाजू शहा यांनी पटली असल्यानेच सेनेला सोबत घेण्याबाबत भाजप प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या तीन नेत्यांत शिवसेनेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक विचार झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व सेना-घटकपक्षांना कसा वाटा द्यायचा यावर खल झाला. फडणवीस यांनी 30-32 जणांचे मंत्रिमंडळ असावे व एकाच विभागाची केलेली वेगवेगळी मंत्रालये एकत्र करावीत असा विचार मांडला. त्याला शहांनी होकार दिला. त्यानुसार भाजप स्वत:कडे 18 पर्यंत मंत्रिपदे ठेवू शकते. शिवसेनेला 4 कॅबिनेट व 4 राज्यमंत्रीपद देण्याबाबत विचार होऊ शकतो. सेनेने उपमुख्यमंत्रीपद मागितले आहे. मात्र हे पद अस्तित्त्वात आणायचे नाही असा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेला 2 वजनदार कॅबिनेटमंत्रीपदे दिली जाऊ शकतात. तर दोन दुय्यम कॅबिनेट मंत्रिपदासह 4 राज्यमंत्रिपद देण्याचा विचार व्यक्त करण्यात आला. याचबरोबर ज्या मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजपने दमदार यश मिळवले त्या 4 घटकपक्षांना 5 मंत्रिपदे देण्याबाबत विचार सुरु आहे. त्यानुसार आठवले यांच्या पक्षाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. याचबरोबर महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद, स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत व मेटेंना राज्यमंत्रिपद देण्याबाबत विचार सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. 10 ते 13 तारखेला फडणवीस सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्याचदरम्यान फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करेल. त्यापूर्वीच शिवसेनेशी अंतिम बोलणी करून त्यांच्या मंत्रिपद संख्येचा विषय संपविला जाणार आहे. त्यानंतर आठवड्याभरानंतर म्हणजेच 20 नोव्हेंबरदरम्यान फडणवीस आपल्या मंत्रिमंडळाचा दुस-या टप्प्यातील विस्तार करू शकतात अशी माहितीही भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.