मुंबई - शिवसेनेला सत्तेत सोबत घ्यावे किंवा नाही याबाबत भाजपमध्ये सध्या दोन मतप्रवाह आहेत. शिवसेनेने जागावाटपात ठेवलेली ताठर भूमिका आणि प्रचारादरम्यान
नरेंद्र मोदी व
अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकाटिप्पणीमुळे त्यांना सत्तेबाहेर ठेवून धडा शिकवावा, असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा व राज्यातील काही नेत्यांचा इरादा आहे, तर प्रदेश भाजपचे अन्य नेते व आमदारांमध्ये मात्र शिवसेनेला सोबत घेऊन एकदाची अस्थिरता संपवावी, अशी भावना आहे. मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या हट्टापायीच शिवसेनेला विरोधी बाकावरच बसवण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपदासाठी
आपला उमेदवार उभा केला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून सत्तासहभागाबाबत काही पर्याय येताे आहे का याचीही चाचपणी उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा सत्तेतील सहभागाबाबतचा विषय आता भाजपच्या लेखी संपला आहे.
‘आता तरी अस्थिरता संपवा’
शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव असला तरी दोन्ही पक्षाचे आमदार मंगळवारी विधानभवनाच्या आवारात हसतमुखाने भेटत होते. दुपारी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर शिवसेना व भाजपच्या ज्येष्ठ आमदारांमध्ये उभ्या उभ्याच गप्पा रंगल्या होत्या. "आता काहीतरी करा पण ही अस्थिरता एकदाची संपवा' अशी विनंती भाजपचे आमदार करत होते. त्यावर "आता आम्ही आणखी काय करावे', असे प्रत्युत्तर शिवसेनेच्या आमदाराने दिले.