मुंबई - 'मेक इन इंडिया'चा अर्थ मला तरी अजून समजलेला नाही. भाजप सरकार कायम शो करण्यात मग्न असते. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत हाेत असलेल्या 'मेक इन इंडिया सप्ताह' या कार्यक्रमाची बुधवारी खिल्ली उडवली. ‘मोदींना दर दोन महिन्यांनी एखादा इव्हेंट हवा असतो’, असा टोला लगावत त्यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, ‘गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी हेच केले होते. पण प्रत्यक्षात किती उद्योग आले हा संशोधनाचा विषय आहे. फक्त करार झाले म्हणजे गुंतवणूक आली असे होत नाही, असे सांगत तुम्ही कधी मेक इन चायना, मेक इन अमेरिका असे ऐकले आहे का?’ अशी विचारणा त्यांनी केली. मोदी अजूनही गुजरातमधून बाहेरच पडलेले नाहीत. भारताचे पंतप्रधान म्हणून ते दिसतच नाहीत. तसेच मेक इन इंडिया हा कार्यक्रम मुंबईतच का ठेवला, दिल्लीत का नाही ठेवला? असे विचारत राज यांनी यामागे भाजपचे राजकारण असल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करताना राज म्हणाले, शिवसेनेला सत्तेतही राहायचे आहे आणि सरकारला विरोधही करायचा आहे. पण याला काहीही अर्थ नाही. त्यांची भूमिका नेहमीच तळ्यात-मळ्यात असल्याचेही राज म्हणाले. ‘आधी चारा छावण्या बंद करायच्या आणि निर्णय अंगावर आला की पुन्हा निर्णय मागे घ्यायचा, हे सर्व कशासाठी केले जात आहे’?, असा सवालही त्यांनी या वेळी केला.
पुढे वाचा... काँग्रेसकडूनही टीका, देशभक्त कोण हे भाजपने ठरवू नये