आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Is Our First Target For This Assembly Election

काँग्रेस-राष्ट्रवादी तर मरून पडलेला साप, भाजपच आमचा खरा शत्रू- उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादी मरून पडलेला साप आहे. त्या सापापासून आम्हाला धोका नाही. मात्र आमच्या एकेकाळच्या मित्रांचे ‘ढोंग’ जनतेसमोर आणणे हे महाराष्ट्र हितासाठी आम्ही कर्तव्यपालन मानतो. तोफा थंडावल्या आहेत, पण तोंडाच्या वाफा दवडणार्‍यांना व तोफा समजून पिचकार्‍या मारणार्‍यांना जमालगोटा द्यावाच लागेल. तसा तो आम्ही आमच्या पद्धतीने दिला आहे. तूर्त इतका डोस पुरा पडावा, नाही तर इतर काढ्यांचा विचार करता येईल, असे सांगत आमचा खरा शत्रू काँग्रेस-राष्ट्रवादी नसून भाजपच असल्याचे शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेनेने ही भूमिका जाहीर करून आपली खरी लढाई भाजपशीच असेल असा स्पष्ट संदेश राज्यभरातील शिवसैनिकांना दिला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपविरोधी अग्रलेख लिहून उद्धव ठाकरेंनी आपल्या मावळ्यांना योग्य तो संदेश दिला आहे. यात काँग्रेस-राष्ट्रवादी मरून पडलेला साप आहे. त्याच्या मागे लागू नका. आपला खरा शत्रू भाजपच असेल असा संदेश दिला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या पण महाराष्ट्र थंडावला असे होणार नाही. एका जिद्दीने तो पेटलेलाच आहे. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा हिमालय वितळतो असे आजपर्यंतचा इतिहास सांगतो. प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढत असल्याने महाराष्ट्रात चौरंगी व पंचरंगी लढतीचा धुरळा उडाला आहे. या बहुरंगात महाराष्ट्राचा नक्की रंग कोणता? अर्थात महाराष्ट्राचा रंग हा फक्त भगवा म्हणजे भगवाच असायला हवा. ज्या दिवशी भगव्या रंगात भेसळ होईल त्या दिवशी महाराष्ट्र आपले सत्त्व गमावून बसेल, अशी हाक उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तून राज्यातील तमाम मतदारांना दिली आहे.
मुंबईत फक्त शिवसेना आणि बाळासाहेबांचाच विचार चालतो असे सांगून अग्रलेखात म्हटले आहे की, बाळासाहेबांनी महाराष्ट्राला व देशाला जाग आणली, मराठी माणसाला खडबडून जागे केले. महाराष्ट्राच्या धमन्यांत अस्मितेचे निखारे भरले. देशात हिंदू म्हणून प्राण फुंकला. ‘होय, हे हिंदू राष्ट्रच आहे!’ असे बेधडक सांगितले, त्या बाळासाहेबांचा महाराष्ट्र वेडीवाकडी पावले कधीच टाकणार नाही. शिवछत्रपतींचा महाराष्ट्र व बाळासाहेबांचा महाराष्ट्र एकच आहे. आता प्रचारात ‘तोफां’च्या नावाखाली ज्या पिचकार्‍या उडत आहेत त्यांची फार दखल घेण्याची गरज नाही. कालपर्यंत मुंबई-महाराष्ट्रात मुलायमसिंग यादव, लालू यादव, भजनलाल वगैरे लोक ‘डेरा’ टाकून आपापल्या जाती व प्रांताच्या मतांचे ‘व्होट बँक’ राजकारण करीत होते. आता म्हणे महाराष्ट्रात संपूर्ण गुजरात उतरवून आमच्या गुजराती बांधवांना ‘फूस’ लावण्याचे प्रयोग सुरू आहेत, पण येथील गुजराती बांधवांची निष्ठा महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच आहे आणि तो त्याच श्रद्धेने शिवसेनेच्या पाठीशी उभा राहणार आहे. राज्याराज्यांचे भाजप खासदार व मंत्री भाजपने खास मैदानात उतरवले आहेत. स्वत: देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळाचा फौजफाटा महाराष्ट्रात उतरवून शिवसेनेचा पराभव करण्याचा विडाच त्यांनी उचलला. पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी केंद्रात ज्यांना बसवले ते पाकिस्तानला ज्यांनी कडवट विरोध केला त्यांच्याच मुळावर उठावेत यासारखे दुर्दैव ते कोणते?, अशा शब्दात शिवसेनेने मोदी व भाजपचा समाचार घेतला आहे.
पुढे आणखी वाचा, भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांवर सेनेने कोणत्या शब्दात केली आहे टीका...