आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापुढे नातलगांना तिकीट देणार नाही - वेंकय्या नायडू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप नेत्यांच्या नातेवाइकांना तिकीट वाटप करणार नाही, असे महाराष्ट्राचे प्रभारी वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी मुंबईतील नेत्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट केले.
केवळ आपला वॉर्ड आरक्षित झाल्याने ऐनवेळी पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे चालवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी या वेळी विलेपार्लेमध्ये घडलेल्या प्रकाराचा उल्लेख करत सांगितले. विलेपार्ले येथे नगरसेवक पराग अळवणी यांनी आपल्या पत्नीला तिकीट मिळावे म्हणून आग्रह धरला होता. त्याला स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्या प्रभागात गेलेल्या निरीक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत नायडू म्हणाले की, झाला प्रकार मुळीच योग्य नव्हता. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली. मुंबईचे अध्यक्ष राज पुरोहित यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही नायडू यांनी केला. नायडू यांनी पुरोहित यांच्याशी खासगीमध्ये बातचीत केली व त्यांची नाराजी आता दूर झाल्याचे उपस्थितांना सांगितले. भाजपने अलीकडेच प्रकाशित केलेल्या महापालिकेतील गेल्या पाच वर्षांतील कार्य अहवाल पुस्तिकेमध्ये राज पुरोहित यांचा फोटो छापला नव्हता.
भाजपचे गटनेते आशिष शेलार यांनी काढलेल्या या पुस्तिकेमध्ये युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचा फोटोही होता, पण पुरोहित यांना वगळण्यात आले. त्यामुळे ते नाराज झाले होते व राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. पण दोनच दिवसांनी पुन्हा ही पुस्तिका छापण्यात येऊन राज पुरोहित यांचा फोटोही नेत्यांच्या रांगेत छापण्यात आला आहे. नायडू यांनी महापालिका निवडणुकीचा आढावा घेत नेत्यांकडून माहिती घेतली.

भाजपमध्ये धुसफूस सुरूच; गटनेत्यांच्या विरोधात तक्रार

महापालिकेतील भाजपचे गटनेते आशिष शेलार यांच्या मनमानी कारभाराविरोधात पक्षाच्या पदाधिका-यांनी राज्याचे प्रभारी वेंकय्या नायडू यांना पत्र लिहिले असून त्यांना निवडणूक समितीचे निमंत्रक म्हणून बोलावू नका, अशी मागणीही केल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये धुसफूस सुरूच आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांची नाराजी दूर होत नाही तोच आता गटनेत्यांच्या विरोधात नाराजी उफाळली आहे. शेलार हे भाजपच्या जाहीरनामा समितीचे सदस्य असल्याने त्याबद्दल सूचना करण्यासाठी त्यांना सांगितले होते. पण त्यांनी मात्र पक्षातील नेत्यांना विचारात न घेता स्वत: भाजपचा महापालिकेतील गेल्या पाच वर्षांतील कार्यअहवाल सांगणारी पुस्तिका प्रकाशित केली, त्यात मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांचा फोटोही छापला नाही, याबाबत पत्रात तक्रार करण्यात आली आहे. मुंबईतील विकास कामे शिवसेना-भाजपने केली असतानाही आपण एकट्याने ती कामे केल्याचा आव त्यांनी आणला असल्याचा आरोपही या पदाधिका-यांनी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेलार हे निवडणूक समितीचे निमंत्रक असून यापुढे होणा-या बैठकीमध्ये त्यांना बोलवू नये. तसा आदेशच पक्षश्रेष्ठींनी काढावा, असेही पत्रात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
खासदार-आमदारांच्या ‘पीएं’ना नगरसेवक होण्याचे वेध !
सेनेत गावकीचे राजकारण चालणार नाही- उद्धव ठाकरे
राजकारण कुटुंबकबिल्याचे