आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंच्या संस्थाही राष्ट्रवादीकडे!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी काकांच्या विरोधात खुलेआम बंड केल्यानंतर आता त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासही सुरुवात केली आहे. परळीची बाजार समिती ताब्यात घेतल्यानंतर आणखी तीन सहकारी संस्थाही पंडितअण्णांच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहेत. या संस्थांवर आजवर गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व होते.
धनंजय यांनी काका गोपीनाथरावांचे पंख कापण्याचे काम पद्धतशीरपणे चालवले आहे. पक्षाचा व्हीप झुगारून धनंजय यांनी परळीच्या नगराध्यक्ष पदासाठी दीपक देशमुख यांना उभे केले आणि भाजपचे उमेदवार जुगलकिशोर लोहिया यांचा पराभव घडवून आणला होता. त्यानंतर त्यांंनी परळी बाजार समिती ताब्यात घेतली. आता मुंडे यांच्या ताब्यातील सहकारी संस्था आणि बँकांच्या अध्यक्षांना आपल्या बाजूला वळवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संस्थांमधील अध्यक्ष समर्थकांसह लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. धनंजय यांनी गोपीनाथरावांच्या वर्चस्वाखालील परळी खरेदी-विक्री संघ, संत जगनमित्र सहकारी सूतगिरणी व परळी पंचायत समितीचे सभापती व उपसभापतींना आपल्याकडे वळवले आहे. धनंजय यांचे वडील पंडितअण्णा 19 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढेच नव्हे, तर मुंडे यांच्या नाथरा गावचे सरपंच अजय मुंडेही पंडितअण्णांसोबत राष्ट्रवादीत जाणार आहेत.
पंडितअण्णांचे जावई डॉ.मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादीत गेले. धनंजय यांच्या बहीण ऊर्मिला केंद्रे यांना नगरसेवक म्हणून राष्ट्रवादीने निवडूनही आणले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे धनंजय यांनीही राष्ट्रवादीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. धनंजय राष्ट्रवादीत जात असल्याने परळी हा गोपीनाथरावांचा बालेकिल्ला आता त्यांच्या हातातून निसटत चालला आहे.