आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Subramanian Swamy Meets Shiv Sena Leaders

भाजप उतावीळ, शिवसेनेची सबुरी; मंत्रिमंडळात योग्य वाटा मिळण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेभरवशाच्या भूमिकेमुळे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपच उतावीळ झाला आहे. त्यामुळेच भाजप नेते आता मातोश्रीवर जाऊन शिवसेनेची मनधरणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र शिवसेनेने सबुरीचा मार्ग स्वीकारून अपमानाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेच्या या नव्या भूमिकेत जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंना पटवून दिलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचा ‘मोठा वाटा’ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शनिवारी सकाळी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि सत्तेतील सहभागाबाबत चर्चा केली.

शिवसेना-भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत भाजपने कोणत्या ना कोणत्या पद्धतीने शिवसेनेला सोबत घेणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले. भाजप शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले पाहिजे असे सांगून त्यांनी शिवसेनेने घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचेच एकप्रकारे समर्थन केले. हिंदूंना चर्चा लांबवण्याची सवय असते, मात्र ते नक्कीच सोबत येतील आणि त्यामुळे राज्याला एक स्थिर सरकार देता येईल असेही त्यांनी म्हटले. सुब्रमण्यम स्वामी नवी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेचा सत्तेतील सहभाग जवळपास निश्चित मानला जात आहे.

१० मंत्र्यांवर सरकार चालवणे अवघड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सरकारसमोरील अडचणी दिसू लागल्या आहेत. केवळ दहा मंत्र्यांच्या आधारावर हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहे चालवणे अवघड असून अजून २० मंत्र्यांची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनीही शिवसेना सत्तेत सहभागी होईल असे सूतोवाच केले आहे.