आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Leaders Demands Contest Assembly Election Own Power

प्रदेश भाजपमध्ये स्वबळाचा नारा, बहुतांश नेत्यांचा शिवसेनाविरोधी सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. महायुतीत भाजपची नेहमीच फरफट होत आली आहे. भाजप स्वबळावर लढला तरच भाजपचा मुख्यमंत्री होईल असे मत प्रदेश भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी म्हटले आहे. याचबरोबर आज झालेल्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी शिवसेनाविरोधी सूर लावल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे 12 वाजण्याची चिन्हे असतानाच युतीतही काही आलबेल नाही हे आजच्या घडामोडीवरून सिद्ध होत आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दादरच्या वसंत स्मृती भवनात कालपासून आयोजित करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला भाजपचे खासदार, आमदार यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर, महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रूडी, पंकजा मुंडे आदींसह राज्यातील सर्व पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित आहेत. त्यावेळी सर्वच नेत्यांनी देशात भाजपला देशात यश पाहता महाराष्ट्रातही पक्ष मोठी घौडदौड करेल असे म्हटले आहे. तसेच राज्यात शिवसेना भाजपपेक्षा सुमारे 50 पेक्षा जास्त जागा लढवत असल्याने भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळणे कसे कठीण आहे याचाच पाढा वाचला. तसेच स्वबळावर भाजप लढल्यास 288 पैकी भाजप किमान 120 जागा जिंकू शकतो असे भाजप नेत्यांना वाटत आहे.
देशात भाजपला छप्पर फाडके यश मिळाल्यामुळे व लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा आणि त्यातही भाजपने 24 पैकी 23 जागा जिंकल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळेच मधु चव्हाण यांनी शिवसेनाविरोधी फटकेबाजी केली. प्रदेश कोअर कमिटीच्या नेत्यांनी याबाबत सावध भूमिका घेतली असली तरी दुय्यम नेत्यांना कामाला लावून भाजपने शिवसेनेला योग्य तो संदेश दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भाजप कोणाच्याही नेतृत्त्वाखाली निवडणुका लढविणार नाही. आम्ही सामूहिक नेतृत्त्वाच्या माध्यमातूनच निवडणूक लढवू.
या बैठकीत फडणवीस यांनी समन्वयाची भूमिका घेताना म्हटले आहे की, महायुतीची सत्ता आणणे हीच मुंडेंना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुंडे पक्षाचे नेतृत्व करतील, याचा आपल्याला आधार होता. पण त्यांच्या अचानक जाण्याचे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढायचे झाल्यास नेत्यांना, कार्यकर्त्यांना आक्रमक व विजयाच्या मानसिकतेने निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. मुंडे नसताना राज्याची सत्ता काबीज करणे भाजपसमोर मोठे आव्हान असेल,' अशी कबूली देत फडणवीस म्हणाले, मुंडेंच्या पश्चात आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. यामुळे आता आपल्या सर्वांना खूप मेहनत घेऊन भाजपला राज्यातील एक क्रमांकाचा पक्ष करावा लागेल.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. नाकर्त्या सरकारविरोधात जनतेचा कौल मागायला जाताना नाराज जनतेच्या मनातील अंगार फुलवण्याचे काम करावे लागणार आहे. एकच लक्ष्य मंत्रालयावर महायुतीचा झेंडा, हे आव्हान समोर ठेवून पुढील तीन महिन्यांत सर्वांनी मेहनत घ्यायला हवी, असे फडणवीस म्हणाले.