(केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे व देवेंद्र फडणवीस यांचे संग्रहित छायाचित्र)
मुंबई- महायुतीच्या जागावाटपाचा मुद्दा सर्वच सहा पक्षांसाठी जिकीरीचा बनत चालला असताना भाजपने शत प्रतिशतची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी भाजपमधील वेगवेगळे नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असताना दिसत आहेत. मुंडे यांच्या मृत्यूनंतर निर्णय घेण्यासाठी सामूहिक नेतृत्त्व तयार करण्यात आले असले तरी त्यांच्यात एकवाक्यतेचा अभाव असल्याचे यातून दिसून येत आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती 100 टक्के होईल. उद्धव ठाकरे व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेटही नक्की होईल असे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तावडेंचा मुद्दा खोडून काढला आहे. पक्षाध्यक्ष शहा आणि उद्धव यांची भेट अद्याप ठरलेली नाही. या दोघांची योग्यवेळी भेट होईल. मिडियांनी या दोघांच्या भेटीचे काळजी करू नये असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजपला 144 जागा हव्यात असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लोकसभेतील यश पाहता भाजपला विधानसभेसासाठी 50 टक्के जागा हव्यात असे पक्षाध्यक्ष अमित शहांचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेनेने त्याला विरोध केला आहे, यावर तोडगा कसा काढणार की महायुती तुटणार असा प्रश्न फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, महायुतीची जागावाटपाबाबत पुढील आठवड्यात अंतिम बोलणी होईल. सर्वप्रथम घटकपक्षांचा प्रश्न मिटवू. त्यानंतर आम्ही व शिवसेना जागा वाटपाच्या बैठकीला बसू. भाजपने शिवसेनेकडे जागांची अद्याप कोणतेही मागणी केली नाही. पक्षाध्यक्ष अमित शहांनी आम्हाला जागांबाबत कोणतेही अट घातलेली नाही. सर्वांना सोबत घेऊन योग्य मार्ग काढा असे सांगितले असल्याचे बोलून फडणवीस यांनी गडकरींचा मुद्दाही खोडून काढला आहे.
पुढे आणखी वाचा, भाजपमध्ये सुरु आहे शह-काटशहाचे राजकारण...