आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Loss In Karnataka, I M Happy Uddhav Thackeray

बरे झाले कर्नाटकातील भाजप सरकार पडले - उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आले याचे दु:ख आहेच, पण मराठी जनतेवर अन्यायाचा वरवंटा फिरवणारे भाजपचे सरकार गेल्याचा आनंदही आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक निकालानंतर दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी बेळगाव, कारवार या सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय-अत्याचार करणार्‍या भाजप सरकारचा पराभव झाल्याबद्दल आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच नव्याने निवडून आलेल्या सरकारमधील लोकांनी लोकशाहीचा आदर करत बेळगाव व सीमा भागातील जनतेवर होणारा भाषिक अत्याचार थांबवावा, असे सांगितले.

कर्नाटकात आजवर सत्तेत आलेल्या सरकारने मराठी बांधवांवर अन्यायच केला. यापुढील काळातही असाच अन्याय सत्तेत आलेले करणार असतील तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत सीमा भागात राष्ट्रपती राजवट लागू करा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कॉंग्रेसने हुरळून जाऊ नये- कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसने हुरळून जावू नये, असे ठाकरे यांनी सांगत लोकसभेच्यावेळी कॉंग्रेसचा प्रवास उलट्या दिशेने प्रवास असेल, असे सांगितले. आगामी निवडणुकांचा अंदाज बांधू नका. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचे चांगले काम चालले असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणार्‍या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाच सत्तेत येईल. केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारने केलेले एकामागून एक उघड होणारे घोटाळे यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा उलट्या दिशेने प्रवास सुरू होईल, असा टोला त्यांनी लगावला.

हा मराठी जनतेचा विजय- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना येडियुरप्पा व त्यानंतर सत्तेत असलेल्यांनी बेळगावात कर्नाटक विधानसभेची इमारत बांधली. एवढेच नाही तर, मराठी महापौर आहेत म्हणून त्या ठिकाणची महानगरपालिका बरखास्त केली. त्या ठिकाणच्या जनतेने त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे दोन उमेदवार विधानसभेत पाठविले, हा मराठी जनतेचा विजय आहे.