आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Maharashtra President Rajeev Pratap Rudi Comment On Congress

भ्रष्टाचार आणि आर्थिक अधोगतीसाठी काँग्रेसच जबाबदार; भाजपचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील भ्रष्टाचार आणि आर्थिक अधोगतीसाठी काँग्रेस जबाबदार असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 300हून अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपचे नवे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी केला.

राज्यातील भाजपमध्ये कोणतेही गट तट नसून सर्वजण एकत्र काम करत असल्याचे स्पष्टीकरण रुडी यांनी पत्रकार परिषदेत दिले. प्रभारी पद स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच मुंबई भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

‘महाराष्ट्र भाजप माजी अध्यक्ष नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटात विभागला गेला आहे?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. मात्र रुडी यांनी गटबाजीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तिसºया आघाडीची संकल्पनाही फेटाळून लावत भाजपप्रणीत रालोआलाच बहुमत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यूपीए-2 चे सहकारी त्यांना सोडत असून आता त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याचे रुडी म्हणाले. याआधी द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसने त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे 272 जागांचे स्पष्ट बहुमत केंद्र सरकारकडे नाही. मात्र, आमच्या पक्षाकडे असलेल्या तरुण नेतृत्वाच्या जोरावर आम्ही नक्कीच 300 जागा जिंकून, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करत रुडी म्हणाले, या दोघांमधील मतभेदांमुळेच यूपीए-2 गेल्या चार वर्षांच्या कारकीर्दीत अपयशी ठरले आहे. यूपीए सरकारच्या निर्णय प्रक्रियेत पंतप्रधान कधीच केंद्रस्थानी नव्हते. ते स्वत: अर्थतज्ज्ञ म्हणवतात व त्यांची प्रतिमाही चांगली असल्याचे म्हटले जाते, पण त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी अधिक गाजली.

अन्न सुरक्षा विधेयकाला पाठिंबा
केंद्र सरकाच्या अन्न सुरक्षा विधेयकाला भाजप पाठिंबा देईल. मात्र, त्याआधी काँग्रेसने आपल्या सहकारी पक्षांचे त्याबाबत असलेले आक्षेप दूर करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने अन्न सुरक्षा विधेयकाबाबत काही वेगळी भूमिका घेतल्याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. या विधेयकासाठी पावसाळी अधिवेशन लांबले तरी हरकत नसल्याचे रुडी म्हणाले.

शहराध्यक्ष निवडीला वेग, पदाधिकार्‍यांशी चर्चा
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करायची याबाबत राजीव प्रताप रुडी यांनी नेते व पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या पदासाठी आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर व आमदार प्रकाश मेहता यांची नावे चर्चेत आहेत. शेलार हे गडकरी व विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. विद्यमान अध्यक्ष राज पुरोहित मुंडेंचे निकटवर्ती असल्याने त्यांना बदलण्यासाठी गडकरी गटातून जोरदार प्रयत्न चालल्याचे बोलले जाते.

भाजप म्हणजे पिझ्झा विदाऊट टॉपिंग्ज : गाडगीळ
काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भारतीय जनता पक्षाकडे देशपातळीवर चांगले नेतृत्व नसल्याची टीका केली आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपचे चार नेतेसुद्धा एकत्र येऊ शकत नाहीत, अशी पक्षाची अवस्था असून सध्याचे भाजप म्हणजे ‘पिझ्झा विदाऊट टॉपिंग्ज’ अशी टिप्पणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.