आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Maharashtra State Government Cabinet Expansion In Nov Last Week.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान, सेनेच्या सहभागाची दाट शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नागपूर - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान होणार असून राजकारणात चर्चेची दारे कधीच बंद होत नाही, असे म्हणत शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचक वक्तव्य केले आहे. फडणवीस आज नागपूरमध्ये होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनेक विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी मुंबई दौर्‍यावर आहेत, यावेळी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि भागवत यांच्यात काही दिवसांपूर्वी दुरध्वनीवरुन चर्चा झाली होती. संघाला भाजपने सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला पाठिंबा रुचलेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच शिवसेनेच्या 80 टक्के आमदारांना भाजपसोबत पुन्हा युती करुन सत्तेत सहभागी होण्याची इच्छा आहे. मात्र भाजप - शिवसेनेत निर्माण झालेली दरी कमी कशी करायची हा दोन्ही पक्षांसमोरचा प्रश्न आहे. त्यासाठी संघ मध्यस्थी करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तर, नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघ आणि भागवत असे काही करणार नसल्याचे म्हटले आहे.
भाजपची शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी बोलणी सुरु असल्यामुळेच सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख लांबली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपला स्थिर सरकार हवे असल्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्याआधी शिवसेनेलासोबत घेऊन मंत्रिमंडळ विस्तार झाला तर भाजपसरकारच्या स्थैर्याला धक्का लागणार नाही.