आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Manifesto Is Looking Copy & Paste From Shivsena, Ncp & Congress Party

भाजपची \'उचलेगिरी\': सेना, काँग्रेस, NCP च्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्यांची ढापाढापी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपने शुक्रवारी मुंबईत प्रकाशित केलेल्या पक्षाच्या ‘दृष्टीपत्र’ जाहीरनाम्यात राज्यातील सर्व विरोधी पक्षांच्या जाहीरनाम्यातील मजकूरांची उचलाउचली केल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमधील अनेक मुद्दे घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील जसेच्या तसे मुद्दे घेत उचलेगिरी केली आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील प्रमुख चार विरोधी पक्षांनी अखंड महाराष्ट्राचा जाहीरनाम्यात पुरस्कार केल्याने स्वतंत्र विदर्भ करण्यावर ठाम असलेल्या भाजपने जाहीरनाम्यात पद्धतशीरपणे बगल देण्यात आली आहे.
भाजपचा जाहीरनामा ‘दृष्टीपत्रे’ या नावाने शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात प्रकाशित करण्यात आला. या दृष्टीपत्रात ग्रामीण विकासासाठी डिजिटल इंडिया या प्रकल्पात ग्रामीण भागात संगणक शिक्षण, कोकण किनारपट्टीवर सागरी जलवाहतूक सुरू करणे, सागरी पर्यटनाला चालना, मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूकव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मेट्रो, मोनो रेल, एलिव्हेटेड रेल्वे, जलवाहतूक, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, शेतकर्‍यांना वयाच्या 65 व्या वर्षी ‘अन्नदाता आधार’ पेन्शन योजना, उद्योगधंद्यांसाठी 24 तास वीजपुरवठा, ‘एलबीटी’ रद्द करणे, पोलीस कर्मचार्‍यांना घरे, लोडशेडिंगमुक्त राज्य, शेतकर्‍यांसाठी माती अहवाल केंद्र निर्मिती, जिल्ह्यात एक शेती शाळा, खेड्यांमध्ये इंटरनेटसाठी वायफाय सुविधा अशा आश्‍वासनांची खैरात भाजपच्या दृष्टीपत्रात आहे. मात्र हे सर्व मुद्दे शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंट आणि वचननाम्यातीलच आहेत. टेलिमेडिसीनद्वारे ग्रामीण भागात उपचार सुविधा देण्याचे वचनही भाजपने जसेच्या तसे उचलले आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राज्याला टोलमुक्त करू असे राज्यातील जनतेला आश्वासन दिले होते. मुंडेंच्या नावाने मते मागणा-या भाजपला मात्र त्यांच्या आश्वासनाचा विसर पडलेला दिसत आहे. मुंडेंनी राज्यातील जनतेला दिलेला शब्द शिवसेना पाळणार असे उद्धव ठाकरेंनी जाहीर सांगत आमची सत्ता आली तर राज्य टोलमुक्त करू असेही वचननाम्यात म्हटले आहे. असे असले तरी भाजपने टोलबाबत केवळ नवे धोरण आणू असे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने टोलबाबत नवे धोरण आणू असे आपल्या जाहीरनाम्यात आधीच म्हटले आहे.
भाजपने शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमधील अनेक मुद्दे उचलल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यांतील काही मुद्दे उचलले आहेत. अशा घोषणाही भाजपने केल्या आहेत. पोलीस कर्मचार्‍यांना हक्काची घरे देणे, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे, राज्यातील सर्व शाळांमध्ये डिजिटल स्मार्ट क्लासरूम स्थापन करणे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जानिर्मिती करणे, वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अल्पभूधारक शेतकर्‍यांना व शेतमजुरांना पेन्शन देणे हे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासने भाजपने जशीच्या तशी उचलली आहेत. तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी दुष्काळनिधी, शेततळी उपक्रम राबवणे, शेतकर्‍यांसाठी योजना तसेच महानगरांसाठी विविध सुविधा देणे आदी मुद्दे जसेच्या तसे कॉपी-पेस्ट केल्याचे दिसून येत आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा भाजपचा जसाच्या तसा जाहीरनामा...