आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp May Not Gives Leader Of Opposition Post For Congress In Maharashtra Assembly

काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्यासाठी भाजप राज्यातही खेळणार रडीचा डाव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेला काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले होते. आता महाराष्ट्र विधिमंडळातही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी भाजपकडून डाव खेळला जात आहे. सध्या विरोधी पक्षनेते असलेली शिवसेना सत्तेत जाणार असल्याने तिस-या क्रमांकांचे आमदार संख्या असलेल्या काँग्रेसला जाणे अपेक्षित आहे. मात्र, काँग्रेसचे 5 आमदार निलंबित केल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे पद राष्ट्रवादीकडे देण्याची शक्यता आहे.
काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद जावे यासाठी भाजपच प्रयत्नशील असल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस आमदारांचे निलंबन सर्वपक्षीय बैठकीत मागे घेतले जाईल असे म्हटले होते. मात्र, आता भाजपने आमदारांचे निलंबन कायम ठेवण्याचा घाट घातल्याचे बोलले जात आहे. आवाजी मतदानामुळे चर्चेत आलेले विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यासंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होते आहे. तत्पूर्वी शिवसेना- भाजपच्या युतीचे सोपस्कर पार पडणार आहे. याचबरोबर येत्या शुक्रवारी फडणवीस आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करीत आहेत. यात शिवसेनेचे 12 तर भाजपचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. सत्तेत सहभागी होताच शिवसेनेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद जाईल. शिवसेना सत्तेत जात असल्याचे समोर येताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नव्याने विरोधी पक्षनेत्याची निवड करावीच लागेल.
काँग्रेसचे विधानसभेत सध्या 43 आमदार आहेत. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर आयोजित केलेल्या तीन दिवसीय अधिवेशनावेळी विधानभवन परिसरात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या स्थितीत हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये काँग्रेसचे 37 आमदार असतील. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त सदस्य असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (सदस्यसंख्या 41) विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाऊ शकतो.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आमचा पक्ष विधानसभा व विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे म्हटले आहे. यात विश्वासदर्शक ठरावावेळी पाठिंबा देणा-या राष्ट्रवादीला भाजप मदत करील अशी चर्चा सुरु झाली आहे. यासाठी भाजपने घटनातज्ज्ञ व कायद्याच्या अभ्यासकांकडूनही माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावरून दूर ठेवण्यासाठी रडीचा डाव लोकसभेप्रमाणे राज्य विधीमंडळात खेळणार असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत भाजप सरकार आल्यापासूनच मोदी लोकशाही मार्गाने न जाता बदला घेण्याच्या भावनेने राजकारण करीत आहे. महाराष्ट्रातही तोच कित्ता आता देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून गिरवणार का? याकडे जानकारांचे लक्ष लागले आहे.