आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp May Not Gives Leader Of Opposition Post For Congress In Maharashtra Assembly

भाजप-शिवसेना युतीनंतर आता विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना-भाजप यांच्यात युती झाल्याचे जाहीर होताच विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दावा केला आहे. सध्या विरोधी पक्षात असलेली शिवसेना भाजप सरकारसमवेत सत्तेत जाणार असल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त होणार आहे. यावर राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते अजित पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. महाराष्ट्रात राजकारणात दुर्मिळ अशी घटना घडत असून आजचा विरोधक पक्ष शिवसेना उद्या सरकारमध्ये सामील होणार आहे तर आज भाजप सरकारला पाठिंबा देणारा राष्ट्रवादी उद्या विरोधात बसण्यासाठी धरपड करीत आहे.
विधीमंडळात आमची सदस्यसंख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याचे सांगत काँग्रेसनेही या पदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चढाओढ पाहायला मिळत आहे. फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शकावेळी आवाजी पद्धतीने मतदान घेतल्यामुळे वादात सापडलेले विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे काय निर्णय घेतात व आणखी एक वादग्रस्त निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.
मागील काही दिवसांपासून भाजप-शिवसेना युती होणार ही चर्चा अखेर आज खरी ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केली. त्यानंतर लागलीच विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते अजित पवार यांनी पक्षाच्या 41 आमदारांसह व चार पुरस्कृत आमदारांसह विरोधी पक्षनेतेपदी दावा करणार असल्याचे म्हटले आहे. छगन भुजबळ यांनीही विधीमंडळाच्या दोन्हीही सभागृहात आमची काँग्रेसपेक्षा जास्त सदस्यसंख्या असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही हीच भूमिका मांडली आहे.
दुसरीकडे, काँग्रेसनेही आपली बाजू मांडत या पदावर दावा करीत राष्ट्रवादीला टोमणे मारले आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका काय ती एकदा जाहीर करावी. देशाच्या, राज्याच्या भल्यासाठी भाजप सरकारला न मागता पाठिंबा देणा-या राष्ट्रवादी आधी सत्ताधारी आहे की विरोध ते जनतेला सांगावे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी केली आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होते आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी नव्याने विरोधी पक्षनेत्याची निवड करावीच लागेल. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष रविवारपर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकतात. त्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ राठोड काय भूमिका घेतात याकडेही लक्ष असेल. काँग्रेसचे सध्या विधानसभेत 42 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर आयोजित केलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनावेळी विधानभवन परिसरात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या स्थितीत हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये काँग्रेसचे 37 आमदार असतील. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत.
असे असले तरी घटनातज्ज्ञांच्या मते, हे पद काँग्रेसकडे देणे योग्य ठरेल. काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहेत. तसेच काँग्रेसचे 5 आमदार जरी निलंबित केले असले तरी त्यांचे सदस्यत्व कायम आहे. त्यामुळे एखाद्याचे निलंबन करणे अथवा निलंबन रद्द करणे हे विधीमंडळातील कामकाजाचा भाग आहे. या आमदारांचे निलंबन रद्द होताच काँग्रेसची विधीमंडळातील संख्या जास्त होईल. अशावेळी लोकशाहीचे सांकेत पाळत हे पद काँग्रेसकडे दिले गेले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारला न मागता बिनशर्त पाठिंबा दिला असल्याने नैतिक पातळीवरही काँग्रेस विरोधी पक्ष असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादीने दावा करायला नको असे अशा घटनातज्ज्ञांचे म्हणणे आहे.