आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: स्टिंग आॅपरेशन; भाजप आमदार राज पुराेहितांची स्वपक्षीयांवरच ताेफ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे कुलाबा मतदारसंघाचे आमदार आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित बेताल वक्तव्यांमुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात पुरोहित यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती एका स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड झाली आहेत. त्यामुळे पुरोहित यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत.

आपण ही सीडी अजून पाहिली नाही. ती पाहिल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणे संयुक्तिक होईल. जर का या सीडीमध्ये काही आक्षेपार्ह आढळले तर ती बाब पक्षाच्या शिस्तभंग समितीसमोर ठेवली जाईल’, असेही दानवे म्हणाले. या आधीही पाणीपुरी प्रकरणात पुरोहित यांनी एका महाविद्यालयीन तरूणीवर अतिशय हीन शब्दात टीका केली होती.

पुरोहित हे मुंडे गटाचे नेते मानले जातात. भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी असताना त्यांना हटवून मधू चव्हाण यांची नियुक्ती करण्याचा निर्णय तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी घेतल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी बंडाचे हत्यार उपसले होते. गडकरींच्या आग्रहामुळे पुरोहित यांना हटवले जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत मुंडेंनी पक्षश्रेष्ठींनाच सरळसरळ आव्हान दिले होते.

मनसेने केली तोडफोड
या स्टींग अॉपरेशनमध्ये राज पुरोहित यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना गल्लीतला नेता संबोधले आहे. शिवाय राज ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले की, तो बोगस नेता आहे. जातियवादी आहे. तो काही जन्मजात नेता नाही किंवा कष्टाळूही नाही त्यामुळे तो फेल गेल्याची टीका आमदार पुरोहित यांनी केली. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज पुरोहित यांचे काळबादेवी येथील संपर्क कार्यालयाची तोडफोड केली असून पुरोहित यांच्या फोटोला काळे फासले आहे.

मुख्यमंत्र्यांविषयी : आज मुंडे हयात असते तर देवेंद्र फडणवीस कुठे व कोण असते?, मुख्यमंत्र्यांवर बिल्डर लॉबी नाराज आहे. आजकाल पक्षात पैसा असणार्‍यांचीच चलती आहे. पैसा ओतला असता तर मलाही मंत्रिपद मिळाले असते; पण तसे होऊ शकले नाही.

मंगलप्रभात लाेढांविषयी : आज पक्षात खडसेंच्या खालोखाल आपण वरिष्ठ असूनही मला मंत्रिपद मिळत नाही, असे सांगताना पुरोहितांनी त्यासाठी लोढांना जबाबदार धरले आहे. लोढांनी निवडणुकीसाठी खूप पैसा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय असो की महापालिका आयुक्तांचे कार्यालय, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकली जाते. लोढांकडे आज असलेला सगळा पैसा महाजनांचा आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तो पैसा लोढाकडेच राहून गेला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

नरेंद्र माेदींबाबत : ‘पक्षात सध्या फक्त दोनच पॉवर सेंटर आहेत?’ या प्रश्नावर उत्तर देताना पुरोहित म्हणतात, काय चूक आहे त्यात.. पक्षात लोकशाही आहे म्हणे, काय अर्थ आहे या लोकशाहीला? पक्षात सामूहिक नेतृत्व नाही. एक माणूस बोलतो, मी सर्वांना सोबत घेऊन चाललो आहे. पण वास्तवात तसे नाही. नरेंद्रभाई काम चांगले करत आहेत; पण चुका होता कामा नयेत. आपल्यावर व्यापारी नाराज होऊ लागले आहेत. तुम्ही आता १ लाखाच्या सोने खरेदीला पॅनकार्ड बंधनकारक केले आहे. त्यामुळे सोन्याच्या व्यापार्‍यांचा धंदा कमी झालाय, याचा व्यापार्‍यांना त्रास होतोय. एकीकडे काळा पैसा आणण्याची भाषा करता आणि दुसरीकडे कोट्यवधींच्या गुंतवणुकीला मोकळे रान देता, हा विरोधाभास आहे. माझी पण मोठमोठ्या व्यापार्‍यांबरोबर ऊठबस असते. त्यांच्याशी बोलल्यावर कळते की हे जे काही चालले आहे, त्यावर व्यापारी खुश नाहीत.

मंत्रिपद मिळत नसल्याने नाराजी केली उघड
मंत्रिमंडळात विस्तारात डावलले जात असल्याने पुरोहित प्रचंड नाराज झाले आहेत. याच निराशेपाेटी त्यांनी मोदी, फडणवीस व लोढा यांच्यावर तोंडसुख घेतल्याचे समोर येत आहे. पुराेहित यांचे स्टिंग करण्यामागे पक्षातीलच विराेधी गट असल्याची शक्यता आहे. पुराेहित व लाेढा यांच्यात शीतयुद्ध आहे. पुराेहित यांनी अनेक वर्षे संघटना उभारणीसाठी चांगले काम केले आहे. मात्र, ज्युनिअर असणारे लोढा हे पक्षात उशिरा येऊन शिरजोर झाल्याने ते नाराज आहेत. याच नाराजीतून पुराेहित यांनी हे आराेप केले असावेत, अशी शंका व्यक्त हाेत आहे.

आशिष शेलारही मंत्रिपदासाठी उत्सुक
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हेसुद्धा मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचे समजते. िवनोद तावडे यांच्यानंतर पक्षातील सतत प्रसिद्धीत असलेला चेहरा म्हणून शेलारांची ओळख आहे. शिवसेनेलाही सतत अंगावर घेण्यात ते पटाईत आहेत. अलिकडेच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली हाेती. मंत्रिपदासाठी शेलार यांनी दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी केली आहे. िशवाय मुख्यमंत्र्यांनाही खुश करण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. यामुळे मंत्रिपदासाठी पुरोहितांच्या वाटेत फक्त लोढाच नाहीत, तर शेलारही असल्याचे सूत्रांकडून कळते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ