आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp mns Divorce After 2.5 Years At Nashik Muncipal Corporation

नाशिक महापालिका: अखेर भाजपचा मनसेला घटस्फोट, शिवसेनेशी पुन्हा गट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक महानगरपालिकेतील मनसे-भाजप या दोन पक्षाची युती अखेर अडीच वर्षानंतर तुटली आहे. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी याबाबतची घोषणा मंगळवारी नाशिक येथे केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांची महायुती आणखी घट्ट होत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप आता नाशिक महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. शिवसेनेकडे महापौरपद तर, भाजप उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे करणार आहे.
गिरीश महाजन यांनी सांगितले की, गेल्या अडीच वर्षापासून नाशिकच्या जनतेला दिलेला कौल पाहून आम्ही मनसेला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मनसेने आमच्यासह जनतेचा भ्रमनिरास केला आहे. कोणतेही चांगले व सकारात्मक काम होत असल्याचे दिसून आले नाही. मनसे हा पर्याय आता विश्वाहार्स वाटत नाही. यातच स्थायी समितीचे अध्यक्षपदासह विविध समित्यांवर भाजपला संधी देण्याचा अलिखीत करार झालेला असतानाही मनसेने शब्द पाळला नाही. दरम्यान, या घडामोडीमागे नितीन गडकरींची भूमिका असल्याचे नाकारत येत नाही. राज ठाकरेंनी नाशकात नरेंद्र मोदींवर जहरी टीका केल्यानंतर मोदी-शहांनी राज ठाकरेंच्या नावावर फुली मारली आहे. मात्र, त्यापूर्वी नाशकात नितीन गडकरी-राज ठाकरेंच्या मैत्रीमुळे भाजप मनसेसोबत गेला होता. मात्र, राज यांनी मोदींसी पंगा घेतल्याने भविष्यात राज ठाकरेबरोबरची राजकीय मैत्री धोकादायक ठरू शकते अशी भीती गडकरींना वाटत असल्याने गडकरींशी व राज ठाकरेंशी जवळीक असलेल्या गिरीश महाजन यांनाच भाजप-मनसेचा घटस्फोट झाल्याचे घोषित करावे लागले आहे.

फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या नाशिक महानगरपालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. 122 नगरसेवक असलेल्या नाशिक पालिकेत मनसेला सर्वाधिक 40 जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल शिवसेना-आरपीआय युतीला 23, राष्ट्रवादीला 20, काँग्रेसला 15, भाजप व त्यांच्या मित्रपक्षाला 17 अशा जागा मिळाल्या होत्या. याचबरोबर सीपीएम 3 व 6 जागांवर अपक्ष विजयी झाले होते.
अडीच वर्षापूर्वी मनसेने भाजप, अपक्षांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांना एकत्र घेत सत्ता स्थापन केली होती. मनसेने यतीन वाघ यांना महापौरपदाची संधी दिली होती. दरम्यान, मनसे आता राष्ट्रवादीशी घरोबा करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास मनसेला नाशिक पालिकेतील सत्ता टिकविण्यात काहीही अडचण नसल्याचे संख्याबळावरून स्पष्ट होते. असे असले तरी मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. राष्ट्रवादीने मनसेशी घरोबा केल्यास काँग्रेसनेही वेगळा विचार करण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पारंपारिक राजकीय शत्रू असलेल्या शिवसेना-भाजपला पाठिंबा देणार का याकडे लक्ष लागले आहे.