आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्या अन् मदत सध्या फॅशनच झालीय- भाजप खासदाराची मुक्ताफळे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना सध्या मदत देण्याची फॅशनच झाली आहे. राज्याराज्यात ही स्पर्धा वाढीला लागली असून, सध्या हा ट्रेंडचा बनला आहे अशी मुक्ताफळे मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी उधळली आहेत.
दरम्यान, शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर टीका होऊ लागताच शेट्टी यांनी खेद व्यक्त केला व आपल्याला तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव केली. गोपाळ शेट्टी यांच्या असंवेदनशील वक्तव्यानंतर काँग्रेससह भाजपचे मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेट्टींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
गोपाळ शेट्टी यांनी काल सायंकाळी माध्यमांशी बोलताना शेतक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. शेट्टी म्हणाले होते की, महाराष्ट्रासह विविध राज्यात सध्या दुष्काळ पडला आहे. केंद्र सरकार मदत करीत आहे. मात्र, दुष्काळ नाहीसा करण्यासाठीची उपाययोजना न करता आत्महत्याग्रस्त शेतक-यांना मदत केली जात आहे. सध्या ही एक फॅशनच बनली आहे व हा ट्रेंड सर्वत्रच दिसत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले.
दरम्यान, शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर माध्यमातूंन त्यांच्यावर टीका होऊ लागली. यानंतर प्रकरण अंगलट येणार असे दिसताच शेट्टी यांनी सपशेल माघार घेत खेद व्यक्त केला. आपण शेतक-यांबाबत संवेदनशील आहोत. मात्र, मदत करण्याची सर्वत्र स्पर्धा लागली आहे. एखाद्या सरकारने 5 लाख रूपये दिले तर दुस-या राज्यातील सरकार 7 लाख रूपये देते त्यामुळे चुकीची स्पर्धा सुरु आहे एवढेच मला म्हणायचे होते अशी सारवासारव शेट्टी यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. खासदार शेट्टी यांना शेती व शेतक-यांतील काय समजते? मुंबई सोडून कधीही बाहेर न गेलेल्या लोकांनी अशी असंवेदनशील वक्तव्ये करू नयेत. शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार भाजप शेतक-यांबाबत कळसच गाठत चालला आहे अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शेतक-यांना सरकारकडून मदतीची मोठी अपेक्षा आहे. ती देता नसेल तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका असे खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.