आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण : गुजरात मॉडेलची टिमकी महागर्जना रॅलीत विरली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण म्हणजे काँग्रेस आणि गांधी घराण्यावर काढलेली भडास. गुजरातच्या ई-गव्हर्नन्स मॉडेलचा उदोउदो, पाकिस्तानला दिलेले इशारे आणि गुजरात दंगलीचा प्रतिवाद. परंतु मुंबईत आज पार पडलेल्या महागर्जना रॅलीत मोदी यांनी या सर्व विषयांना बगल दिल्याचे ठळकपणे जाणवले.
मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख केला. विशेष म्हणजे रा. स्व. संघाला पूजनीय अशा गोळवलकर आणि हेडगेवार या विभूतींचा नामोल्लेख त्यांनी कटाक्षाने टाळल्याचे दिसले.

हिंदुत्वाचा कोणताही मुद्दा त्यांनी भाषणात घेतला नाही. पाकिस्तानला एकही इशारा दिला नाही की अल्पसंख्याकांची अडूनअडून हेटाळणीसुद्धा केली नाही. त्यामुळे साडेतीन लाख कार्यकर्त्यांच्या या विशाल रॅलीत मोदींना टाळ्या आणि घोषणांचा प्रतिसाद तसा कमीच होता.