आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोकणात भाजप-राष्ट्रवादी एकत्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लांजा (रत्नागिरी)- लांजा नगरपंचायतीच्या आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या संपदा वाघधरे यांनी लांजाचे पहिले नगराध्यक्षपद पटकावले. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीला मदत करीत धोबीपछाड दिला आहे. भाजप व अपक्षांची साथ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने तोडफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन खेचून घेतली.
लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला 5 तर राष्ट्रवादी 4 व भाजप 2 जागा मिळाल्या होत्या. याचबरोबर तब्बल 6 अपक्ष निवडून आले होते. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीसोबत घरोबा करीत नवी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यातच सहा अपक्षांपैकी पाच अपक्षांमधील रवींद्र कांबळे, सुगंधा कुभार, पूर्वा मुळये, मुरलीधर निवळे, मदन राडये यांनी शिवसेनेने अधिकृत उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. या सर्वांची आमदार राजन साळवी यांनी तिकिटे कापल्याने ते सेनेबरोबर न जाता लांजा शहर विकास आघाडीला सहकार्य केले.
दरम्यान, पूर्वा मुळये यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आहे. साळवींनी तिकीट वाटपादरम्यान केलेली चूक सुधारत पूर्वा मुळ्ये या अपक्ष नगरसेविकेला सेनेत परत घेत नगराध्यक्षपदासाठी उभे केले. मात्र, इतर 5 अपक्ष नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत येण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत शहर विकास आघाडीच्या संपदा वाघधरे यांनी सेनेच्या मुळये यांचा 11 विरूद्ध 6 असा पराभव केला. मनोहर कौसे यांना उपनगराध्यक्षपद देण्यात आले. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची व्यूहरचना फसल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार उद्य सामंत यांनीही सेनेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांनाही यश आले नाही.